
मुंबई – महाराष्ट्रात २९ महानगरपालिकांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आयोजन ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे राज्य निवडणूक आयोगावर बंधन आहे.
यामुळे आगामी काही काळात महापालिका निवडणुकांचा तुफान वेगाने प्रचार-प्रसार आणि तयारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने केवळ महापालिका नाही तर ग्रामीण भागातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकत्र घेण्याच्या दृष्टीनेही तयारी सुरू केली आहे.
कधी होणार निवडणुकीची अधिकृत घोषणा?
निवडणूक आयोगाच्या हालचालीवरून असे समजते की, महापालिका निवडणुकीची घोषणा काही दिवसांत करण्यात येऊ शकते. राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन लवकरच संपणार असून त्यानंतर डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणुकांचा कार्यक्रम अधिकृतरित्या जाहीर होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीसाठी अंतिम मुदत कोणती?
सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आयोजन पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे आयोगाला जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापूर्वी निवडणुका संपवणे आवश्यक आहे. वेळेची बचत करण्यासाठी आयोग तातडीने निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
मतदार याद्या तयार करण्याचे काम जोरात सुरू-
माहितीप्रमाणे, महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादीची तयारी वेगाने सुरू आहे. अंतिम प्रभागानिहाय मतदार यादी १० डिसेंबर २०२५ पर्यंत प्रसिद्ध करण्याचे आयोगाचे उद्दिष्ट आहे. यानंतर निवडणूक कार्यक्रम कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे.
१२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही होऊ शकतात एकाच वेळी-
राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुका आयोजित करताना १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकत्र घेण्याचा विचार सुरू केला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा पाळणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका सध्या घेणे शक्य नाही, अशी स्थिती आहे.
निवडणुकीस मुभा असलेल्या १२ जिल्हा परिषदा-
न्यायालयाने लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्हा परिषदा आणि त्यातील १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. महापालिका निवडणुकीसोबतच या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही जाहीर होण्याची शक्यता असून मतदानासाठी वेगळ्या तारखा असू शकतात.
अंतिम निर्णय अजून बाकी-
जिल्हा परिषद निवडणुका जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली, तर महापालिका निवडणुका आयुक्तांच्या नेतृत्वाखाली होतात. दोन्ही निवडणुका यशस्वी पार पाडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, पोलीस यंत्रणा यांचा आढावा घेऊन पुढील दोन-तीन दिवसांत निवडणुका एकत्र घेण्याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.









