नागपूर – शहरातील शांतशीर परिसरात मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली, ज्याने संपूर्ण शहर हादरवून टाकले. अवघ्या संशयाच्या आधारे एका युवकाने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली. ३४ वर्षीय हेमलता वैद्य, ज्या एका बिल्डरच्या ऑफिसमध्ये काम करत होत्या, त्यांना त्यांच्या प्रियकर अक्षय दाते (२६) याने लोखंडी रॉडने मारहाण करून ठार मारले. ही भीषण घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा परिसरात घडली.
हेमलता या मूळच्या हिंगणघाटच्या रहिवासी होत्या. पतीच्या कोविडमधील निधनानंतर त्या आपल्या मुलीसह दाभा येथे राहत होत्या आणि स्थानिक बिल्डर अभिषेक केवलरामानी यांच्या कार्यालयात फ्लॅट दाखवण्याचे काम करत होत्या. तिथेच त्यांची ओळख अक्षयशी झाली आणि त्यांच्या प्रेमसंबंधांना सुरुवात झाली. मात्र या नात्यात संशयाची जळजळ होती.
मंगळवारी रात्री सुमारे ८:३० वाजता हेमलता बेसमेंटमध्ये खुर्चीवर बसून काम करत होत्या. त्याचवेळी अक्षय तिथे पोहोचला. तिथे असलेल्या एका अनोळखी पुरुषाला पाहून तो काही वेळ वर गेला. तो पुरुष निघून गेल्यानंतर अक्षय पुन्हा खाली आला आणि अचानक हेमलता यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने सपासप वार करू लागला. हेमलता यांच्या किंकाळ्या बेसमेंटमध्ये घुमल्या, पण अक्षयने जीव जात नाही तोपर्यंत मारहाण थांबवली नाही.
ही हृदयद्रावक घटना अपार्टमेंटमधील सीसीटीव्हीत कैद झाली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अक्षयला केवळ २४ तासांत अमरावतीच्या तिवसा येथून अटक केली असून, त्याला नागपूरला आणून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, अक्षयला हेमलता यांचं इतर पुरुषांशी बोलणं आवडत नव्हतं. त्याला सतत वाटत होतं की हेमलता यांचे आणखी कुणाशी संबंध आहेत. याच संशय आणि ईर्ष्येच्या आगीत त्याने तिचा जीव घेतला.
विशेष म्हणजे गेल्या २४ तासांत नागपुरात दोन महिलांची हत्या झाल्याने शहरातील पोलीस प्रशासन खळबळून गेले आहे. तर नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.