नागपूर : जुन्या सोनेगाव विमानतळ रस्त्यावरील ऐतिहासिक भोंसलेकालीन आमराई परिसर, जो दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील नागरिकांसाठी सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी आवडते ठिकाण मानलले जाते , तोच परिसर आता कचराघर आणि ओपन बारमध्ये परिवर्तित होत असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे.
कधी काळी गर्द झाडांनी वेढलेली, आमराईसह सुबाभूळ आणि इतर वृक्षांनी नटलेली ही हिरवीगार जागा आज सांडपाण्याच्या बाटल्या, बिअरच्या बाटल्या, प्लास्टिकचे कचरे, वापरलेले ग्लास आणि स्नॅक्सच्या पिशव्यांनी भरून गेली आहे. स्थानिक श्रीकृष्ण मंदिर आणि हनुमान मंदिरामुळे हा परिसर श्रद्धास्थान मानला जात होता. मात्र, सध्या येथे खुलेआम दारू पिण्याच्या घटना, गर्दीचे अड्डे आणि “लव्हर्स पॉईंट” म्हणून ओळख मिळवणाऱ्या उपद्रवांमुळे परिसराची शोभा मलिन झाली आहे.
नागरिकांच्या मते, शहरातील हिरवेगार पट्टे आधीच झपाट्याने नष्ट होत आहेत. त्यात या आमराईलाही कचराकुंडीचे रूप दिले जात असल्याने पर्यावरणीय आणि सामाजिक संकट निर्माण झाले आहे.
सचिन द्रवेकर यांनी मुख्यमंत्र्यांना, महानगरपालिका आयुक्तांना, लक्ष्मीनगर झोन आयुक्तांना आणि स्वच्छता अधिकाऱ्यांना पत्र लिहून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी तातडीने कचरा व्यवस्थापन, अतिक्रमण रोखणे आणि सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
स्थानिकांच्या अपेक्षेनुसार, प्रशासनाने लवकर कारवाई करून भोंसलेकालीन आमराईला पुन्हा एकदा हिरवाईचे आणि शांततेचे रूप मिळवून द्यावे, अशी मागणी होत आहे.












