Published On : Mon, Aug 19th, 2019

प्रत्येक गरिबाला हक्काचे घर; प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांची लॉटरी सोडत

Advertisement

नागपूर : प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून समाजातील सामान्य व गरीब माणसाला घर देण्याचा शासनाचा संकल्प आहे. गरीब माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्यांना फ्लॅटमध्ये राहण्याची संधी मिळणार आहे. नागपूर शहरातील कोणताही गरीब माणूस बेघर राहणार नाही. प्रत्येकाला हक्काचे घर मिळेल. घरासोबतच पिण्याचे शुध्द पाणी व अन्य जीवनावश्यक सोयी नागरिकांना उपलब्ध करुन देणार, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

नागपूर महागर विकास प्राधिकरण व नासुप्र यांच्या संयुक्त विद्यमाने नैवेद्यम सभागृहात आयोजित कार्यक्रमात रविवारी नागपूर शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांची लॉटरी सोडत काढण्यात आली. यावेळी अध्यक्षीय भाषणात गडकरी बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार यांच्यासह खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे डॉ. मिलिंद माने, महानगर आयुक्त शीतल उगले, अप्पर आयुक्त हेमंत पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

नितीन गडकरी म्हणाले की, हक्काचे घर असाव हे प्रत्येकाचे स्वप्न असते. सामान्य नागरिकांच्या घरांच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना आहे. या योजनेतून ४३४५ घरांची सोडत काढण्यात येत आहे. वाठोडा, तरोडी व वांजरी यासारख्या पाच ठिकाणी ही घरे बांधण्यात आलेली आहेत. मलनिस्सारण व्यवस्थेसह सर्व सुविधायुक्त ही घरे आहेत. लॉटरी सोडत ही पारदर्शी पध्दतीने होण्यासाठी आॅनलाईन काढण्यात येत आहे. उर्वरित घरे डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होतील. प्रत्येकाला घर देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याची ग्वाही गडकरी यांनी दिली. यावेळी प्राधान्यक्रमानुसार आरक्षित वर्गातील यशस्वी अर्जदारांच्या पाच सोडती मान्यवरांच्या हस्ते काढण्यात आल्या.

घरकूल प्रकल्पात अशा आहेत सुविधा
संरक्षण भिंत, योगा सेंटर, नित्योपयोगी वस्तूंची दुकाने, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आवश्यकता असल्यास स्वतंत्र मल निस्सारण व्यवस्था, पावसाळी नाल्या, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पार्किंग, मीटर रुम, बाह्य विद्युतीकरण, सार्वजानिक सुविधेकरिता सौर ऊर्जा संच, सौर ऊर्जेवर चालणारे पथदिवे इत्यादी सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली असून, यापैकी काही अंतिम टप्प्यात आहे.

सोडतीचा निकाल ऑनलाईन उपलब्ध
लॉटरी सोडत सोहळ्याचा संपूर्ण निकाल सोमवारी https://pmay.nitnagpur.org संकेत स्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. नामप्रविप्राद्वारे पोस्ट लॉटरीच्या निविदा आमंत्रित करण्यात आल्या होत्या. लाभार्थ्यांचे अर्ज व सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी संगणषीकृत https://pmay.nitnagpur.org यावर अर्ज मागविण्यात आले होते. लॉटरी सोडतीनंतर काही संबंधित पत्रव्यवहाराची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान १५ ते २० दिवसांचा कालावधी लागणार आहे.

त्यामुळे लाभार्थ्यांनी पुढील २० ते २५ दिवस नामप्रविप्रा व नासुप्रच्या कार्यालयात संपर्क करू नये. तथापि, अधिक माहितीसाठी नामप्रविप्राह्णच्या https://pmay.nitnagpur.org या संकेत स्थळावर (वेबसाईट) भेट द्यावी, असे आवाहन नासुप्रतर्फे करण्यात आले आहे. या संकेत स्थळावर लाभार्थ्यांनी प्रथम View result यावर क्लिक करून यानंतर Application no द्यावा; नंतर लॉटरीचा संपूर्ण निकाल संकेत स्थळावर दिसेल. लाभार्थ्यांना हा निकाल पीडीएफ फॉर्मेटमध्ये डाऊनलोड करता येणार आहे. तसेच यासंदर्भात महत्त्वाची माहिती द्यावयाची असल्यास, सदर माहिती लाभार्थ्यांना नोंदणीकृत भ्रमणध्वनीवरून एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.