Published On : Tue, Oct 26th, 2021

रमाई घरकूल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बुधवारी भव्य मोर्चा

मोर्चा संबंधी आढावा बैठक संपन्न : चंद्रशेखर बावनकुळे, आ.प्रवीण दटके, महापौर दयाशंकर तिवारी करणार नेतृत्व

नागपूर: रमाई घरकूल योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व महाविकास आघाडीला जागविण्यासाठी बुधवारी २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता भारतीय जनता पार्टीच्या झोपडपट्टी आघाडी, महिला आघाडी आणि अनुसूचित जाती मोर्चातर्फे संयुक्तरित्या संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. भाजपा प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके आणि महापौर दयाशंकर तिवारी हे मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. या मोर्चाच्या संदर्भात सोमवारी (ता.२५) मोर्चाचे मुख्य संयोजक भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वात आढावा बैठक घेण्यात आली.

आढावा बैठकीत अशोक मेंढे, माजी आमदार डॉ. मिलींद माने, गिरीश देशमुख, सुनील मित्रा, नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, सतीश सिरसवान, ॲड. राहुल झांबरे, बंडू सिरसाठ, डॉ.कीर्तिदा अजमेरा, परशू ठाकुर, राजेश हाथीबेड, भैय्यासाहेब बिघाने, रामभाउ आंबूलकर आदी उपस्थित होते.


रमाई घरकूल आवास योजनेच्या पात्र लाभार्थ्यांवर महाविकास आघाडी सरकारकडून अन्याय होत असून या अन्यायाविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. मोर्चाद्वारे रमाई घरकूल आवास योजनेच्या नागपुरातील पात्र लाभार्थ्यांना पक्क्या घरांचे बांधकाम करता यावे म्हणून महाविकास आघाडी सरकारने नागपूर महानगरपालिकेला ४० कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा, नागपूर शहरातील सर्व झोपडपट्टीवासीयांना त्वरीत मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात यावे, या मागण्या करीत निद्रावस्थेतील महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यात येणार आहे.

भाजपा प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, आमदार गिरीश व्यास, आमदार नागो गाणार, प्रा. संजय भेंडे, ॲड. धर्मपाल मेश्राम, अर्चनाताई डेहनकर, अशोक मेंढे, डॉ. मिलींद माने, अश्विनीताई जिचकार, संदीप जाधव, सतीश सिरसवान, मनोज चवरे, संजय बंगाले, नरेंद्र (बाल्या) बोरकर, रामभाउ आंबूलकर, सुनील मित्रा, राजेश हाथीबेड, नीताताई ठाकरे, परशू ठाकुर आदी मोर्चाचे नेतृत्व स्वीकारतील.

नागपूर शहरातील गोरगरीब लोक जे स्वत:च्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहत आहेत. त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याचे मनसूबे बाळगून असलेल्या निगरगट्टी महाविकास आघाडी सरकारला जागे करून गोरगरीब पात्र लाभार्थ्यांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन बुलंद करण्याचा निर्धार आढावा बैठकीत करण्यात आला. आढावा बैठकीचे समारोपीय भाषण गिरीश देशमुख यांनी केले.