नागपूर – शहरातील लालगंज परिसरातल्या राऊत चौकाजवळ असलेल्या ‘प्रथमेश गारमेंट्स’ या रेडीमेड कपड्यांच्या दुकानाला गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीने काही मिनिटांतच उग्र स्वरूप धारण केले आणि लाखो रुपयांचा कपड्यांचा साठा भस्मसात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दुपारी साधारण १२:१५ च्या सुमारास ही आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दुकानात रेडीमेड कपड्यांचा मोठा साठा असल्याने आगीने काही क्षणांतच जोर धरला. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या लकडगंज, कलमणा, गंजीपेठ व सुगत नगर येथून चार अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी अथक प्रयत्न करत काही वेळात आग आटोक्यात आणली.
दरम्यान, या आगीत अंदाजे १५ लाख रुपयांहून अधिक किमतीचा माल जळून खाक झाला. ही दुकान रहिवासी परिसरात असल्याने आग शेजारील घरांपर्यंत पोहोचण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र अग्निशमन दलाच्या वेळेवरच्या कार्यवाहीमुळे मोठा अनर्थ टळला. प्राथमिक तपासणीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समोर आले आहे.
स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.