नरखेड – सततची नापिकी आणि बँकेच्या कर्जाचा तगादा यामुळे त्रस्त झालेल्या एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) मध्यरात्री जलालखेडा येथे घडली.
मृत शेतकऱ्याचे नाव गणेश नामदेव कळंबे (वय ४५) असे आहे. त्यांच्याकडे केवळ दीड एकर शेती होती. शेतीसाठी त्यांनी भारतीय स्टेट बँक शाखा जलालखेडा येथून ७३ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, मागील काही वर्षांपासून सतत नापिकी आणि बाजारात मिळणारा शेतमालाचा कमी भाव यामुळे उत्पन्नाचे स्रोत आटले. परिणामी, कर्जफेडीचे दडपण वाढत गेले आणि त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
गणेश हे कुटुंबवत्सल व मेहनती स्वभावाचे शेतकरी होते. शुक्रवारी रात्री कुटुंब झोपले असताना त्यांनी घराच्या अंगणात लोखंडी सळईला गळफास घेतला. दरवाजा बाहेरून बंद केल्यामुळे घरातील मंडळींना याची कल्पना आली नाही. मात्र, मध्यरात्री त्यांच्या पत्नीला जाग आल्यावर गणेश घरात नसल्याचे लक्षात आले. दरवाजा उघडताच तिच्या डोळ्यासमोर अंगणातील भीषण दृश्य उभे राहिले.
घाबरलेल्या पत्नीने तातडीने चुलत दीरास संपर्क साधला. दरवाजा उघडून त्यांनी गणेशला खाली उतरवले आणि शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी जलालखेडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास ठाणेदार तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तसेच पटवारी रामदास दवंडे यांनी घटनास्थळी पंचनामा करून संबंधित अहवाल तहसीलदार कार्यालयात सादर केला आहे.