नागपूर: पुणे जिल्ह्यातील भूअभिलेख विभागाचे दोन वरिष्ठ अधिकारी सध्या अडचणीत आले आहेत. जमिनीच्या मोजणीसंदर्भात ५० लाख रुपयांची लाच मागितल्याच्या गंभीर आरोपांनंतर उप-अधिक्षक अमरसिंह पाटील आणि मोजणी अधिक्षक किरण येटोळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी तक्रारदारानं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे थेट तक्रार केली होती. त्यानंतर प्रशासनाने लक्ष घातल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, पीडिताने २०२३ पासून पुणे ग्रामीणमधील एका शेतजमिनीची मोजणी व हद्द निर्धारण प्रक्रियेबाबत सातत्यानं अर्ज करूनही अधिकारी टाळाटाळ करत होते. याच दरम्यान, अमरसिंह पाटील व किरण येटोळे यांनी कामासाठी ५० लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे. एवढंच नाही तर, “हेलिकॉप्टर शॉट लावतो” अशा प्रकारची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
या तक्रारीनंतर पुणे शहरातील आर्थिक व सायबर गुन्हे शाखेनं प्राथमिक चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.