नागपूर – हिंगणा नाका परिसरात आज सायंकाळी एका हृदयद्रावक अपघातात ७ वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. शाळेतून परतत असताना आईच्या समोरच एका भरधाव ट्रकने त्याला चिरडलं. अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह पळून गेला, मात्र काही अंतरावर एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली.
मृत बालकाची ओळख अहान सूरज नायक (वय ७, रा. श्रमिक नगर, एमआयडीसी, नागपूर) अशी झाली आहे. अहान आपल्या आई तुलसी नायक आणि बहिण स्नेहासोबत रामदासपेठ येथील ट्युशन क्लासवरून ऑटो रिक्षाने घरी परतत होता. सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास ते हिंगणा नाका टी-पॉईंटजवळ थांबले. तुलसी रिक्षाचालकाला पैसे देत असताना मागून आलेल्या सफेद-भुऱ्या ट्रक (क्र. MH 40/CR/5100) ने भरधाव वेगात येत अहानला जोरदार धडक दिली.
धडकेनंतर अहान ट्रकच्या पुढील चाकाखाली आला आणि देशमुख ट्रेडिंग कंपनीपासून शांतनु ट्रेडिंग दुकानापर्यंत फरफटत गेला. या अपघातात तुलसी नायक यांच्या पायाला देखील दुखापत झाली. नागरिकांच्या मदतीने अहानला तत्काळ लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे ठाणेदार महेश चौहान, पोलिस निरीक्षक संजय बनसोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांकडून मिळालेल्या माहितीवरून ट्रक काही अंतरावर ताब्यात घेण्यात आला आणि चालकास अटक करण्यात आली.
हिंगणा रोडवर वाहनांची भरधाव वाहतूक सुरू असते. अनेक वेळा स्पीड ब्रेकरची मागणी होऊनही प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. परिणामी या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.