मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून सन्यास घेण्याची घोषणा केली आहे. पाच दिवसांच्या या कसोटी प्रकारातून निवृत्ती घेत असल्याचे रोहितने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून सांगितले.
आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर टेस्ट कॅपची एक खास छायाचित्र शेअर करत रोहितने लिहिले, “पांढऱ्या जर्सीत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती. गेल्या काही वर्षांत मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.”
टी-20 क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतलेला रोहित आता केवळ वनडे क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
रोहित शर्माने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण 67 सामने खेळले असून त्यामध्ये त्याने 40.57 च्या सरासरीने 4301 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 12 शतके आणि 18 अर्धशतके नोंद आहेत. त्याची सर्वोच्च कसोटी धावसंख्या 212 आहे. 26 डिसेंबर रोजी त्याने आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ही निश्चितच एक भावनिक आणि मोठी बातमी आहे, कारण रोहित शर्मा हा संघातील एक अनुभवी आणि विश्वासार्ह खेळाडू होता. आता तो वनडे प्रकारात आपले योगदान देत राहणार आहे.