Published On : Wed, Jul 29th, 2020

दहावीत मनपाच्या शाळांचा ८५.२८ टक्के निकाल

तीन शाळांचा १०० टक्के निकाल : विशेष कोचिंगचे फलित

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात नागपूर महानगरपालिकेच्या शाळांनी झेप घेतली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मनपाच्या शाळांचा निकाल ३५ टक्क्यांनी वाढला असून यंदाचा निकाल ८५.२८ टक्के एवढा आहे. विशेष म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या तीन शाळांनी शंभर टक्के निकाल देत मनपा शाळाही मागे नाहीत हे दाखवून दिले आहे. याशिवाय १२ शाळांनी ९० टक्क्यांच्या वर निकाल देण्याची कामगिरी बजावली आहे. शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे आणि अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या संकल्पनेतून आणि शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर यांच्या अंमलबजावणीतून यावर्षीपासून विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या विशेष कोचिंगचे हे फलित आहे.

दुर्गानगर मनपा मराठी माध्यमिक शाळेचा विद्यार्थी जयंता अलोणे याने ९४.६ गुणांसह प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. दत्तात्रयनगर मनपा मराठी माध्यमिक शाळेचा समीर जांभुळकर हा ९३.८ टक्क्यांसह द्वितीय तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम आलेला आहे. शिवणगाव मराठी माध्यमिक शाळेची विद्यार्थीनी भारती नगरारे आणि दुर्गानगर मनपा मराठी माध्यमिक शाळेचा विद्यार्थी संतोष गिरी या दोघांनीही ९०.८ टक्के गुणांसह तिसरा क्रमांक पटकाविला आहे. मराठी शाळांची एकूण टक्केवारी 92.25% आहे.

इंग्रजी माध्यमातून जी.एम.बनातवाला मनपा इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. ९०.६ टक्क्यांसह अंशारा मुनिबा या विद्यार्थिनीने प्रथम, ८३.६ टक्के गुणांसह तस्मीया कौसर ने द्वितीय व ७६.८ टक्के गुण प्राप्त करून मोहम्मद मन्सुरी याने तिसरा क्रमांक पटकाविण्याचे कामगिरी केली आहे. इंग्रजी शाळांची एकूण टक्केवारी 66.66% आहे.

हिंदी माध्यमातून मनपाच्या सरस्वती तिवारी माध्यमिक शाळेच्या तृप्ती दुबे या विद्यार्थिनीने ८९.६ गुणांसह पहिला, विवेकानंद हिंदी माध्यमिक शाळेच्या मिहिर कोकर्डेने ८५ टक्क्यांसह दुसरा आणि लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळेच्या पिंकी शुक्ला या विद्यार्थिनीने ८४.६ टक्के गुणांसह तिसरा क्रमांक पटकाविला आहे. हिंदी शाळांची एकूण टक्केवारी 80.97% आहे.

उर्दू माध्यमातून एम.के.आझाद माध्यमिक शाळेची निशा नाज सादीक ९४ टक्के गुणांसह पहिली आली. तर याच शाळेची आलीया बानो सादीक ने ९०.८ टक्के गुण पटकावून दुसरा क्रमांक पटकाविला आणि ८९.२ टक्के गुण मिळवून फिरदोस परवीन नूर तिसरी आली. उर्दू शाळांची एकूण टक्केवारी 92.73% आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांमधून डॉ.आंबेडकर मराठी माध्यम शाळेचे विद्यार्थी चेतन काकडे व शिवराज सावळे यांनी ७६.२ टक्के गुण घेउन प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.

म.न.पा.शाळेतील १२१ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीमध्ये आणि ३८९ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहे.

गुणवंतांचा सत्कार
दहावीच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा बुधवारी (ता.२९) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्थायी समिती सभापती विजय (पिंटू)झलके, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, शिवसेना गटनेते किशोर कुमेरिया, शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, सहायक शिक्षणाधिकारी कुसूम चाफलेकर, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे म्हणाले, मनपाच्या शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत पालकांची मुले शिकतात. मात्र या मुलांमधील प्रतिभा ओळखून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मनपाच्या शाळांचे शिक्षक मेहनत घेतात. या सर्व मुख्याध्याध्यापक आणि शिक्षकांच्या मेहनतीचे फळ आज निकालाच्या रूपात दिसत आहे. यावर्षी सुरू करण्यात आलेल्या विशेष कोचिंगमुळे निकालाचा टक्का वाढला आहे. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी मांडलेली संकल्पना आणि शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर यांनी त्याची केलेली पुरेपुर अंमबजावणीचा हा निकाल आहे.

विशेष कोचिंग उपक्रमांतर्गत मनपाच्या शाळांतील विद्यार्थ्यांची चाचणी घेउन त्यातील सर्वोत्तम १०० मुलांची निवड करण्यात आली. या १०० विद्यार्थ्यांना मार्गदर्शिका पुरविण्यात आल्या. याशिवाय नियमित त्यांच्या चाचण्याही घेण्यात आल्या. विशेष म्हणजे या चाचण्यांचे पेपर मनपा शाळांमध्ये तयार न करता शहरातील नामांकित शाळांच्या शिक्षकांमार्फत तयार करण्यात आले. या नियमीत सरावांमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कमतरता, त्रुट्या दिसून आल्या आणि त्यासाठी शिक्षकांचे वेळेत मार्गदर्शनही मिळाले. मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर घेतलेल्या मेहनतीमुळे आज मनपा शाळांकडे पाहण्याचा सामान्यांचा दृष्टीकोन बदलला आहे, असेही प्रा. दिलीप दिवे म्हणाले.

अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी गुणवंतांसह मनपाच्या सर्व मुख्याध्यापक तथा शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या यशामागे असेलेल शिक्षकांचे यश आहे ठळकपणे दिसून येत आहे, अशा शब्दांत त्यांनी शिक्षकांचे प्रोत्साहन वाढविले. मनपा शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी अशा विविध उपक्रमांची गरज आहे व पुढेही असे उपक्रम राबविण्यात येतील, असे ते म्हणाले.

१०० टक्के निकाल देणा-या मनपाच्या शाळा

– शिवणगाव मराठी माध्य.शाळा

– डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठी माध्य.शाळा

– कामगारनगर उर्दू माध्य.शाळा

९० टक्क्यांवर निकाल देणा-या शाळा

– जयताळा मराठी माध्य.शाळा

– दुर्गानगर मराठी माध्य.शाळा

– डॉ.राम मनोहर लोहिया मराठी माध्य.शाळा

– विवेकानंदनगर हिंदी माध्य.शाळा

– लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्य.शाळा

– कपीलनगर हिंदी माध्य.शाळा

– ताजाबाद उर्दू माध्य.शाळा

– गंजीपेठ उर्दू माध्य.शाळा

– साने गुरूजी उर्दू माध्य.शाळा

– गरीब नवाज उर्दू माध्य.शाळा

– पेन्शननगर उर्दू माध्य.शाळा

– एम.ए.के. आझाद उर्दू माध्य.शाळा