नागपूर : सोनेगाव परिसरातील ८२ वर्षीय सुरेश पोटदुखे यांच्याकडून ३२ लाख रुपयांचा ऐवज लुटल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. विनायक मुंडाफळे (५४, रा. दिघोरी), विनोद सोनटक्के (४९, रा.महाल ), नायजर रोनाल्ड उर्फ सॅनिटायझर (रा. इमामवाडा ), शुभम मानके (२७) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. सोनेगाव पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांची १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी (पीसीआर) मिळवली. या प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
स्थानिक इंग्रजी दैनिकातील वृत्तानुसार, पोटदुखे यांनी त्यांचा ड्रायव्हर विनायक मुंडाफळे आणि त्याचा मित्र विनोद सोनटक्के यांना यापूर्वी अनेकदा मदत केली होती, परंतु गेल्या आठवड्यात इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटीतील त्यांच्या निवासस्थानावर त्यांनी दरोडा टाकला.
पोटदुखे यांच्या घरातून 25 लाखांच्या रोख रकमेसह 32 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. पोटदुखे यांची पत्नी त्यांच्या मुलीच्या घरी उपचारासाठी गेली असल्याने ते एकटेच राहत होते. सॅनिटायझर आणि शुभम मानके यांच्यासह मुंडाफळे व सोनटक्के यांना गुन्हे शाखेने अटक करून शनिवारी सोनेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. चौघांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सोनेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बळीरामसिंग परदेशी यांनी दिली.
पोटदुखे यांनी आपल्या आजारी मुलाला वाचवण्यासाठी आर्थिक मदतीची वृत्तपत्रातील जाहिरात पाहून मुंडाफळे यांची भेट घेतली. पोटदुखे यांनी त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी अनोळखी असलेल्या मुंडाफळे यांना केवळ आर्थिक मदतच दिली नाही तर त्यांना त्यांचा चालक म्हणूनही कामाला लावले. मुंडाफळे यांनी सोनटक्के यांची पोटदुखे यांच्याशी ओळख करून दिली होती. सोनटक्के यांनीही पोटदुखे यांच्याकडून बँकेचे कर्ज व इतर कर्जे फेडण्यासाठी आर्थिक मदत घेण्यास सुरुवात केली होती. पोटदुखे यांच्याकडून त्यांनी वेगवेगळ्या वेळी सुमारे चार लाख रुपये उसने घेतले होते.
पोटदुखे यांच्याकडून इतकी मदत मिळाल्यानंतरही मुंडाफळे आणि सोनटक्के यांनी दरोड्याचा कट रचला होता आणि दरोडा टाकण्यासाठी पवन आत्राम नावाच्या मुलाची मदत घेतली. मुंडाफळे आणि सोनटक्के यांनी अनेक वेळा त्या ठिकाणी भेटी दिल्यानंतर, प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग, सीसीटीव्हीची जागा, खोल्या, आलमारीची जागा, तिजोरीच्या किल्ल्या आणि इतर तपशील तयार केले.
सीसीटीव्ही आणि सेल फोन टॉवर लोकेशन्स आणि कॉल डिटेल्स तपासणाऱ्या पोलिसांनी काही संशयितांना स्कूटरवर ट्रिपल सीटवर आणि आणखी तीन जणांना दुचाकीवर पाहिले होते. दुचाकीवरील टोळीचा संबंध मुंडाफळे आणि सोनटक्के यांच्याशी असल्याचे निष्पन्न झाले, तर स्कूटरवरील इतर तिघांचा परिसरातील इतर चोरींमध्ये सहभाग असल्याचे उघड झाले असून त्यांचा पोलिसांकडून शोध घेणे सुरू आहे.