
मुंबई : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. लाभार्थ्यांची पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रियेनंतर तब्बल ८० लाखांहून अधिक महिलांना अपात्र ठरविण्यात आले असून, सुमारे १४ हजार पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. या पुरुष लाभार्थ्यांकडून मिळालेली संपूर्ण रक्कम वसूल केली जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, विविध शासकीय डेटाबेस आणि कागदपत्रांची छाननी केल्यानंतर अनेक अपात्र लाभार्थी आढळून आले. यामध्ये १४ हजार पुरुष, सुमारे ५ लाख सरकारी कर्मचारी, १० लाख आयकरदाते तसेच पात्रतेच्या निकषात न बसणारे इतर लाभार्थी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे.
दरम्यान, अपात्र ठरलेल्या महिलांना मात्र दिलासा देण्यात आला आहे. यापूर्वी मिळालेल्या हप्त्यांची रक्कम त्यांच्याकडून परत घेतली जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र ज्या व्यक्तींनी जाणूनबुजून चुकीची माहिती देऊन किंवा फसवणूक करून लाभ घेतला आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
ई-केवायसी न करणे, उत्पन्न मर्यादा ओलांडणे, वयोमर्यादेबाहेर असणे किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ घेणे यांसारख्या कारणांमुळे अनेक महिला अपात्र ठरल्याचे सरकारचे म्हणणे आहे. सध्या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या सुमारे १.७ कोटींवर आली असून, पात्र महिलांना लाभ मिळत राहील, असा दावा राज्य सरकारने केला आहे.
विरोधकांनी मात्र या निर्णयावर टीका करत राज्य सरकार आर्थिक अडचणीमुळे लाभार्थी संख्या कमी करत असल्याचा आरोप केला आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, “एकाही पात्र महिलेला योजनेतून वगळण्यात आलेले नाही. केवळ अपात्र आणि चुकीची माहिती देणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे,” असे स्पष्ट केले.







