संपूर्ण शहरात समसमान पाणी पुरवठ्यासाठी महत्वकांक्षी योजना
नागपूर : नागपूर शहरामध्ये समसमान पाणी पुरवठा व्हावा याकरिता २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना मनपाद्वारे सुरू करण्यात आली आहे. या योजनेला बळकटी देत संपूर्ण शहरामध्ये ही महत्वकांक्षी योजना लागू करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये ७८ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.
नागपूर शहरामध्ये २०११-१२पासून २४ बाय ७ ही योजना कार्यरत असून या योजनेचे १०० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना नळाद्वारे २४ तास पाणी पुरवठा होणे शक्य होणार आहे. याशिवाय सद्यस्थितीत होणा-या ६५० एमएलडी पाणी पुरवठ्यामध्ये होणारी गळती सुद्धा कमी करता येणार आहे. यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेची घोडदौड सुरू आहे. शहरातील ३० टक्के पाईपलाईन बदलविण्याचे प्रस्तावित होते व ते काम सुद्धा पूर्ण झाले आहे.
गोरेवाडा येथे बी.पी.टी. करिता २००० मि.मी. व्यासाची २ किमी पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय पेंच टप्पा २ जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्याचे काम, सीताबर्डी फोर्ट येथे नवीन जी.एस.आर.चे काम, गोरेवाडा येथील गोडबोले गेट दुरूस्तीचे काम, ६७६ किमी पैकी ७०७ किमी पाईपलाईन बदलविण्याचे काम, ३२०२११ पैकी २४६९६० नळ जोडण्याचे कमा, एकूण १७५ फ्लो मीटर ऐवजी १६२ फ्लो मीटर बसविण्याचे काम, १९ ई.एस.आर./जी.एस.आर./एम.बी.आर. पैकी १८ दुरूस्तीचे काम, ३३७ पैकी २३७ बटरफ्लाय व्हॉल्सचे काम अशी उपरोक्त सर्व कामे पूर्ण झालेली आहेत.
संपूर्ण प्रकल्पाची ९७.४१ टक्के भौतिक प्रगती झाली आहे. सद्यस्थितीत एकूण ६८ ई.एस.आर. कमांड एरिया पैकी २८ कमांड एरियामध्ये (स्लम वगळून) २४ बाय ७ पाणी पुरवठा करण्यात आला आहे. उर्वरित कमांड एरियामध्ये पाणीपुरवठा योजना २४ बाय ७ करणे शक्य झालेले नाही. ते करण्यासाठी महत्वाचे पाउल मनपातर्फे उचलण्यात आले आहे. संपूर्ण शहर २४ बाय ७ पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने मनपातर्फे ७८ कोटीचा प्रस्ताव करण्यात आला असून ते सर्व कार्य निविदेद्वारे करण्याचा मानस आहे. संपूर्ण अतिरिक्त काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित कमांड एरियामध्ये सुद्धा समसमान पाणी पुरवठा सुरळीतपणे करण्यात यशस्वी होता येईल, असा विश्वास आहे.