नागपूर : अंबाझरीतील एनआयटी स्विमिंग पूलमध्ये शुक्रवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. पोहण्यासाठी आलेल्या ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा पोहताना मृत्यू झाला.
मृत व्यक्तीचे नाव जयंत नारायण कवरे (वय ७४) असे असून ते अत्रे ले-आउटमधील प्रकाश अपार्टमेंट, फ्लॅट क्रमांक ६/३० येथे राहत होते. दररोजप्रमाणे ते ११ जुलै रोजी सकाळी सुमारे ९.४५ वाजता पोहण्यासाठी एनआयटी स्विमिंग पूलवर आले होते. मात्र पोहत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले.
बघ्यांनी तातडीने त्यांना पाण्याबाहेर काढले आणि वोक्हार्ट रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती संजय विश्वनाथ कारगुतकर (वय ६२, रा. एच.बी. इस्टेट, सोनेगाव) यांनी पोलिसांना दिली. त्यावरून बजाज नगर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार गजबिये यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.