नागपूर :देशभरातील तरुणांसाठी सुवर्णसंधी ठरलेल्या १६व्या राष्ट्रीय रोजगार मेळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. यावेळी विविध सरकारी विभागांमध्ये निवड झालेल्या ५१,००० पेक्षा अधिक उमेदवारांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्ती पत्रे वितरित करण्यात आली. नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १४९ उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्तीपत्रे देण्यात आली.
उत्तर नागपूरमधील मंगल मंडप येथे आयोजित कार्यक्रमात रेल्वे, डाक, संरक्षण, आरोग्य इत्यादी विभागांमधील निवड झालेल्या उमेदवारांना नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. हा कार्यक्रम नागपूर रेल्वे विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
पंतप्रधान मोदींचा युवा वर्गाला संदेश-
या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करताना सांगितले, “भारत हा सर्वात मोठा लोकशाही राष्ट्र आहे आणि आपल्या देशात सर्वाधिक युवा शक्ती आहे. नव्याने निवड झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी हा संधीचा उपयोग देशसेवेकरिता करावा.” त्यांनी ‘नागरिक प्रथम’ या तत्त्वज्ञानाचे स्मरण करून देत लोकसेवेचे महत्त्व अधोरेखित केले.
नितीन गडकरी : रोजगार निर्मितीला प्राधान्य-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी रोजगार निर्मितीला दिलेले सर्वोच्च प्राधान्य या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरत आहे. देशभरात आतापर्यंत १० लाखांहून अधिक नियुक्तीपत्रे या उपक्रमाद्वारे वितरित करण्यात आली आहेत.”
रोजगार मेळा म्हणजे युवाशक्तीसाठी प्रेरणादायी मंच-
गडकरी म्हणाले की, “रोजगार मेळा हे केवळ नियुक्तीचे साधन नसून, युवाशक्तीच्या सक्षमीकरणाचा आणि राष्ट्रीय विकासात त्यांच्या सहभागाचा एक महत्वाचा टप्पा आहे. सरकारच्या विविध विभागांमध्ये ही भरती झाल्यामुळे तरुणांना देशाच्या सेवेत योगदान देण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमामुळे नवोदित कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, रोजगारासाठी धडपडणाऱ्या असंख्य उमेदवारांना प्रेरणा मिळाल्याचे दिसून येत आहे.