Published On : Thu, May 31st, 2018

मनपाचे कर्मचारी नदीकाठावर पर्यावरणदिनी लावणार ६० हजारांवर बांबूची झाडे

Bamboo tree plantation
नागपूर: महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेने एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट घेतले आहे. त्यादृष्टीने तयारीही सुरू झाली आहे. मात्र, तत्तपूर्वी ५ जून अर्थात पर्यावरणदिनी आयुक्तांसह मनपाचे सर्व अधिकारी, कर्मचारी प्रत्येकी पाच याप्रमाणे शहरातील नदीकाठांवर सुमारे ६० हजार बांबू आणि आजनच्या रोपट्यांची लागवड करणार आहे. पदाधिकारी, नगरसेवकही यामध्ये सहभागी होणार असून या अभिनव उपक्रमाच्या तयारीचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले आहे.

यासंदर्भात गुरुवारी (ता. ३१) मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात बैठक पार पडली. बैठकीला आयुक्त वीरेंद्र सिंह, अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी ङेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, राजेश मोहिते यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

नदीकाठावर बांबू आणि आजनच्या झाडांची लागवड करण्याची संकल्पना आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी मांडली. शासकीय वृक्ष लागवड मोहिमेत एक लाख वृक्षांचे उद्दिष्ट असले तरी त्याव्यतिरिक्त नवा उपक्रम म्हणून नागपुरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदी या तीनही ठिकाणी एकाच दिवशी, एकाच वेळी वृक्षारोपण केले जाईल. झोननिहाय या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत असून नदीचे संपूर्ण नदीच्या पात्रात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. नदी ज्या भागातून जाते त्या भागातील प्रभागातील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसुद्धा प्रशासनातर्फे या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात येणार आहे. महानगरपालिकेतील प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक नगरसेवक, प्रत्येक अधिकारी, प्रत्येक कर्मचारी आणि प्रत्येक सफाई कामगारसुद्धा यामध्ये सहभागी होईल, अशी माहिती आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिली.

बांबू आणि आजनची वृक्ष लावण्यामागचा उद्देश असा की या झाडांना कुठलेही जनावरे खात नाही. त्यामुळे यांना ट्री गार्डची आवश्यकता पडणार नाही. नदीच्या तीरावर गाळ थांबविण्याचे कार्य ही वनस्पती करेल आणि या झाडांमुळे नदी तीराचे सौंदर्यही खुलेल.

या संपूर्ण उपक्रमाची तयारी आजपासून सुरू झाली असून ३ जून रोजी संपूर्ण तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. शासकीय मोहिमेतील वृक्ष लागवडीची तयारी १० जूनपर्यंत पूर्ण करायची असून तो कार्यक्रम पुढे महिनाभर चालेल. याअंतर्ग़त नागपूर महानगरपालिकेच्या शाळा, खुले भूखंड, प्राथमिक आरोग्य केंद्र, दवाखाने आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे.