Published On : Thu, May 31st, 2018

पालघरचा विजय हा कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ, विजय दिवंगत वनगा साहेबांना समर्पित

Ravindra Chavan
पालघर: भाजपच्या पराभवासाठी विरोधकांनी आखलेली संपूर्ण रणनिती उधळून लावत मतदारांनी भाजपच्या विचारांना, विकासाच्या राजकारणालाच पसंती दिली, त्याबद्दल पालघरवासियांचे धन्यवाद अशा शब्दांत राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील विजयाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. अतिशय प्रतिकुल परिस्थितीतही प्रचंड मेहनत करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा विजय साकारला असून भाजपच्या वतीने हा विजय म्हणजे दिवंगत वनगा साहेबांना श्रद्धांजली आहे, अशी भावनाही त्यांनी विजयानंतर व्यक्त केली. मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांचे गुरूवारी सकाळीच हृदय विकाराने दु:खद निधन झाल्याने या विजयाबद्दल कोणताही विजयोत्सव साजरा केला जाणार नसल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी शिवसेनेचे उमेदवार चिंतामण वनगा यांचा तब्बल २९ हजार ७७२ मतांनी पराभव केला आहे. भाजपच्या पराभवासाठी सर्व विरोधकांनी दंड थोपटले असतानाही भाजपने मिळवलेल्या या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर विजयात मोलाची भुमिका बजावलेल्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. पालघरमधील विजयाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, संपुर्ण निवडणुक काळात पालघर मतदारसंघातील प्रत्येक शहरात, गावात आणि पाड्यावरील बुथ स्तरावर कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. दिवंगत वनगा साहेबांचा विचार या विजयाच्या रुपाने कायम राहवा, यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता इथे झटला आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलेले मार्गदर्शन, तसेच राज्य सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेतृत्वाखालील केंद्र सरकारने चार वर्षांत केलेले काम यावर मतदारांनी शिक्कामोर्तब केले आहे. चांगल्या आणि विकासात्मक विचारांचा हा विजय असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. विराेधकांच्या आरोपांबाबत विचारले असता ते म्हणाले की, विरोधक आरोप करत असतातच, मात्र त्यांच्या आरोपाकडे दुर्लक्ष करून आम्ही काम केले. किंबहुना विरोधकांनी जेव्हा खोटे आरोप सुरू केले तेव्हाच आम्हाला विजय आपलाच आहे, ही बाब कळून चुकली होती, असा टोला त्यांनी हाणला. हा विजय दिवंगत वनगा साहेबांना अर्पण करत असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या दु: खद निधनाबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला.