Published On : Tue, Dec 24th, 2019

पक्ष्यांच्या प्रजातींचे वास्तव्य पक्षी निरीक्षकांना 55 स्थलांतरित पक्ष्यांचे आकर्षण

Advertisement

नागपूर : गोरेवाडा संरक्षित अभयारण्यासह येथील समृद्ध अशा गोरेवाडा तलावाच्या परिसरात 216 विविध प्रजातींच्या पक्ष्यांचे वास्तव्य असून यापैकी 50 ते 55 प्रकारच्या स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनामुळे पक्षी निरीक्षकांसह पर्यटकांना पक्ष्यांचा जवळून अभ्यास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. गोरेवाडा तलावातील पक्ष्यांचे विश्व पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक आकर्षित होत आहेत.

वनविकास महामंडळातर्फे गोरेवाडा प्रकल्प विकसित करण्यात येत असून गोसेखुर्द प्रकल्पामध्ये गेलेल्या वन जमिनीच्या पर्यायी वनीकरणासाठी गोरेवाडा येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. सुमारे 21 किलोमीटर परिसरात वन्य प्राण्यांच्या विविध प्रजातींचे संरक्षण व संवर्धन करण्यात आल्यामुळे नागपूर शहराला लागून असलेल्या गोरेवाडा बायोपार्कला पाहण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे.

गोरेवाडा बायोपार्क परिसरात सुमारे 120 वर्षांपूर्वी गोरेवाडा तलावाची निर्मिती सीती गोंडीन यांनी केल्याची नोंद असून हा तलाव नागपूर शहराला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी करण्यात आला होता. गोरेवाडा जंगलाच्या विस्तीर्ण परिसरात असलेल्या या तलावाच्या सभोवताल मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचे वास्तव्य असून स्थलांतरित पक्षी हे या तलावाचे मुख्य आकर्षण आहे. क्रेस्टेड ग्रेब हा पक्षी सुमारे पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच पाहायला मिळाला. यासोबतच रेड क्रेस्टेड पोचार्ड, रुडी सेल्डक, गडवाल, नॉर्थन शॉलर, शेंडीवाला बदक, हूडहूड, रेड स्टार्ट आदी स्थलांतरित पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले आहे.

पक्षी निरीक्षकांसाठी वन विकास महामंडळातर्फे विविध सुविधा उपलब्ध करुन दिली असून बायनाकुलर (दुर्बीण) तसेच पक्षी निरीक्षकांसाठी गाईडची व्यवस्था सुद्धा उपलब्ध असल्यामुळे पक्षांच्या नावासह त्यांची वीण, वास्तव्याचे ठिकाण आदी सर्व माहिती उपलब्ध होत आहे. तलावाच्या सभोवताल बर्ड हायडर लावण्यात आले आहे, याशिवाय दहापेक्षा जास्त ठिकाणी बर्ड स्टडीची व्यवस्था करण्यात आली आहे.

गोरेवाडा परिसरातील समृद्ध वनसंपदा तसेच तलावातील पक्ष्यांची माहिती व्हावी, यासाठी अडीच किलोमीटरची नेचर ट्रेल तयार करण्यात आली आहे. त्यासोबतच सायकलवरुनही नेचर ट्रेल बघण्याची सुविधा आहे. गोरेवाडा बायोपार्कमध्ये निलगाय, सांबर, ससे, विविध प्रकारचे फुलपाखरे, पक्षी, सरपटणारे प्राणी यामध्ये साप, अजगर यांसह मोर आदींचे वास्तव्य आहे. हा परिसर मानवी वस्तीला लागून असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाळीव जणावरांचा त्रास टाळण्यासाठी 21 किलोमीटर परिसराला संरक्षण भित्त बांधून पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे येथील समृद्ध वनसंपदेचे रक्षण करणे शक्य होत आहे.


गोरेवाडा बायोपार्कच्या सौंदर्यीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगताना या प्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी पांडुरंग पाखले यांनी परिसरातील 216 प्रकारच्या वास्तव्य असलेल्या समृद्ध पक्षी जगताची माहिती दिली. हिवाळ्या दरम्यान मोठ्या प्रमाणात विदेशी पक्षी हजारो ‍ किलोमीटरचा प्रवास करुन या परिसरात वास्तव्याला येतात. त्यामुळे पक्षी निरीक्षणाची सुविधा गोरेवाडा प्रकल्पात प्राधान्याने करण्यात आली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.