Published On : Tue, Dec 24th, 2019

स्थायी समिती सभापती व जलप्रदाय समिती सभापतींनी केली ‘खाऊ गल्ली’च्या कामाची पाहणी

Advertisement

नागपूर: अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेली खाउ गल्ली लवकरच सुरू होणार आहे. याबाबत महापौरांच्या निर्देशानुसार ‘खाऊ गल्ली’मध्ये आवश्यक कामे केली जात आहेत. या कामांची मंगळवारी (ता.२४) स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे व जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक डॉ.रवींद्र भोयर, मनोज साबळे उपस्थित होते.

गांधीसागर तलावाच्या काठावर ‘खाऊ गल्ली’ तयार करण्याची योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासंदर्भात महापौर संदीप जोशी यांनी काही दिवसांपूर्वी दौरा करून ‘खाऊ गल्ली’चे निरीक्षण केले. यावेळी तातडीने आवश्यक दुरुस्तीसंदर्भात कार्यवाही करण्याचे त्यांनी निर्देशही दिले होते. या कामाची स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांच्यासह अन्य मान्यवरांनी पाहणी केली.

‘खाऊ गल्ली’मध्ये येणा-या नागरिकांच्या वाहनांच्या पार्कींगची मोठी समस्या राहणार आहे. ही बाब लक्षात घेत तलावाच्या एका बाजूला पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्कींगस्थळी आवश्यक बांधकाम सुरू असून या कामाचीही पाहणी करून त्याबाबत संबंधितांकडून मान्यवरांनी कामाचा आढावा घेतला.

महापौरांच्या ‘वॉक अँड टॉक विथ मेयर’, ‘ब्रेकफास्ट विथ मेयर’या कार्यक्रमांमध्ये ‘खाऊ गल्ली’संदर्भात नागरिकांनी अनेक तक्रारी मांडल्या होत्या. या तक्रारीवर दखल घेत महापौरांनी ‘खाऊ गल्ली’चे निरीक्षण केले. यावेळी खाऊ गल्लीतील पार्किंगमधील तुटलेले फ्लोरिंग तातडीने दुरूस्त करणे, आय ब्लॉक दुरुस्ती, नागरिकांसाठी वॉटर ए.टी.एम. सुरू करणे, परिसरातील सर्व पथदिवे तातडीने सुरू करणे, तलावाच्या रेलिंगला लागून असलेली झुडुपे, गवत काढणे, परिसरात स्वच्छता ठेवणे आदी निर्देश महापौरांनी दिले होत. महापौरांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या कामाची पाहणी मंगळवारी (ता.२४) स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे व जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी केली.