Published On : Thu, Jan 18th, 2018

गडचिरोलीच्या विकासासाठी ५३५ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करावी – वित्तमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी

नवी दिल्ली : नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांसाठी 535 कोटी रूपयांची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पात करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे केली.

नॉर्थ ब्लॉक येथील केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कार्यालयात श्री.मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री यांची भेट घेतली. श्री.मुनगंटीवार यांनी गडचिरोली जिल्ह्याची सविस्तर माहिती देत सांगितले, गडचिरोली जिल्हा हा नक्षल प्रभावित असून हा जिल्हा आदिवासीबहुल तसेच सामाजिक-आर्थिक मागासलेला आहे. गडचिरोली जिल्ह्याची एकूण लोकसंख्येच्या 34 टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. येथील मानव विकास निर्देशांक 0.20 असून या निर्देशांकाचा क्रमांक राज्यात 34 वा असल्याचे सांगितले. राज्याचे दरडोई उत्पन्न 98000 आहे. मात्र, गडचिरोली जिल्ह्याचे दरडोई उत्त्पन्न 47 हजार आहे. तसेच शिक्षण घेण्याचे प्रमाण 11 टक्के असल्याची वस्तुस्थिती केंद्रीय गृहमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली.

गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी राज्य शासनाने या ठिकाणी गोंडवाना विद्यापीठ उभारले असून येथे विविध नवीन अभ्यासक्रमांची सुरूवात व्हावी, तसेच येथील इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 240 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून मिळावा. यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होईल. यासह गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते व पुलांच्या बांधकामांसाठी 200 कोटी रूपयांचा निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. नक्षलप्रभावित भाग असल्यामुळे पोलिसांना अधिक साधन संपन्न असण्याची गरज व्यक्त करीत पोलीस सक्षमीकरणासाठी 10 कोटी 14 लाख रूपये, यासह मोबाईल तसेच इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्यासाठी 45 कोटी 42 लाख रूपये, सिंचनासाठी 36 कोटींचा निधी असे एकूण 535 कोटी 16 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबतची विनंती श्री.मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे केली. श्री.सिंग यांनी याबाबत सकारात्मक आश्वासन दिले.