Published On : Thu, Jan 18th, 2018

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेच्या जाणीव जागृती रथयात्रेस राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : मुलींचा जन्म, त्यांचे आरोग्य, पोषण आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महिला व बालविकास विभागामार्फत ‘माझी कन्या भाग्यश्री’ जाणीव जागृती अभियान रथयात्रा काढण्यात आली आहे. राजमाता जिजाऊ यांचे जन्मगाव असलेला सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) येथून त्यांच्या जयंतीदिनी (दि. 12 जानेवारी) सुरु झालेली ही रथयात्रा राज्याच्या विविध भागातून जात असून लोकांकडून त्याचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे.

ही रथयात्रा सिंदखेडराजा येथून पुढे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी (जि. अहमदनगर) येथून विविध जनजागृती कार्यक्रम राबवत पुढे वाटचाल करीत आहे. 20 जानेवारी रोजी ही रथयात्रा मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचे जन्मगाव असलेल्या वनंदगाव (जि. रत्नागिरी) येथे जाणार आहे. पुढे कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वाटचाल करीत ही रथयात्रा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव (जि. सातारा) येथे 22 जानेवारी रोजी जाणार आहे. तिथे एका भव्य जनजागृतीपर कार्यक्रमात या रथयात्रेचा समारोप होणार आहे.

रथयात्रेस राज्याच्या विविध भागात लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. गावागावात रथयात्रेचे उत्स्फुर्त स्वागत होत आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याचे तसेच त्यांचे पोषण, शिक्षण आणि आरोग्याबाबत भेदभाव न करण्याचा संकल्प लोक करीत आहेत.

या संदर्भात प्रतिक्रिया देताना महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘मुलगीच माझा वारसदार’ हा विचार लोकांमध्ये रुजणे गरजेचे आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना आणि माझी कन्या भाग्यश्री योजनेद्वारे यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत. यापुढील काळात ही योजना राज्यात प्रभावीपणे राबवून मुलींच्या जन्माचे स्वागत होणे तसेच त्यांचे योग्य शिक्षण, योग्य पोषण होण्यासाठी शासनामार्फत व्यापक प्रयत्न करण्यास येतील, असे त्यांनी सांगितले.