Published On : Wed, Oct 20th, 2021

52 अनाथ बालकांना प्रत्येकी 5 लक्ष रुपयांचा सानुग्रह निधी -जिल्हाधिकारी

Advertisement

कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षणातून रोजगार,जिल्हा कृतीदलाची बैठक

नागपूर : कोविड -19 महामारीमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना शासनाकडून पाच लक्ष रुपयाची मदत मुदत ठेव प्रमाणपत्राच्या स्वरुपात दिल्या जाते. त्यातून त्या अनाथ बालकांचे सुरळीत संगोपन व शिक्षणाची जबाबदारी पार पाडल्या जाते. दोन्ही पालक गमावलेल्या जिल्ह्यातील 52 अनाथ बालकांना शासनाकडून 5 लक्ष रुपयाची मुदतठेव मंजूर करण्यात आली असून येत्या 23 ऑक्टोबरला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याहस्ते मुदतठेव प्रमाणपत्र संबंधितांना वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज येथे दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात आयोजित जिल्हा कृतीदलाच्या कामाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे, पोलीस उपअधीक्षक संजय पुरंदरे, माविमचे सहाय्यक जिल्हा समन्वयक व्ही. एम. झाडे, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष राजीव थोरात, महापालिकेचे डी. एम. उमरेडकर, सी. एम. बोंडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक प्रकाश कांचनवार, तसेच जिल्हा कृतीदलाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

कोविड -19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची सद्यस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत आढावा घेऊन जिल्हाधिकारी म्हणाल्या की, जिल्ह्यात कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 71 आहे. त्यापैकी 69 बालकांचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आणि संबंधित लाभार्थी यांचे संयुक्त बँक खाते उघडण्यात आले आहे. दोन्ही पालक गमावलेल्या 58 बालकांची केंद्र शासनाच्या पी. एम. केअर पोर्टल या संकेतस्थळावर नोंदणी झाली असून 48 बालकांना बाल कल्याण समितीची मान्यता देण्यात आली आहे.

कोविड -19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना शासनाकडून पाच लक्ष रुपयाची मदत मुदत ठेव प्रमाणपत्राच्या स्वरुपात दिल्या जाते. त्यातून त्याचे सुरळीत संगोपन व शिक्षणाची जबाबदारी पार पाडल्या जाते. दोन्ही पालक गमावलेल्या जिल्ह्यातील 52 अनाथ बालकांना शासनाकडून 5 लक्ष रुपयाची मुदत ठेव मंजूर करण्यात आली असून येत्या 23 ऑक्टोबरला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याहस्ते मुदत ठेव प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.

कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या पालकांच्या संपत्तीबाबत ती कायम राहावी म्हणून जिल्हा निबंधक आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून मार्गदर्शन मिळवून जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने संपत्तीची नोंदणी करावी. अनाथ बालकांकडून कोणत्याही शाळेने शाळा शुल्क घेऊ नये यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शासकीय तसेच खासगी शाळांना सूचना द्याव्यात. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अनाथ प्रमाणपत्र तसेच रहिवाशी प्रमाणपत्र वितरणाची कार्यवाही संबंधित विभागाने पूर्ण करावी, असे त्यांनी सांगितले.

कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना महानगरपालिकेकडून तीन टक्के मदत निधी योजनेतून उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिकेच्या महिला व बालविकास विभागाने तत्काळ कार्यवाही करावी. कोविडमुळे पतीचे निधन झाल्याने विधवा झालेल्या महिला भगिनींना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे, म्हणून कौशल्य विकास योजनेअंतर्गत विधवा भगिनींना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज येथे दिले.

दिव्यांग बालकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळेल
दिव्यांग बांधवांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धेमधून निश्चितच त्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केले.

समेकित क्षेत्रीय कौशल विकास, पुनर्वास व दिव्यांगजन सशक्तिकरण केंद्र (सी. आर. सी.) नागपूरच्या वतीने पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कविवर्य सुरेश भट सभागृह येथे नुकतेच दिव्यांग बालक व बांधवांसाठी विविध स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या.

महापौर दयाशंकर तिवारी, आमदार मोहन मते, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, सक्षमचे पदाधिकारी श्री. दार्वेकर, मनपाचे क्रीडा अधिकारी पियुष अंबुलकर, विख्यात बालरोगतज्ञ उदय बोधनकर, मुकबधीर विद्यालयाच्या प्राचार्या मिनल सांगोळे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी आमदार मोहन मते, उदय बोधनकर, सिध्दार्थ गायकवाड, श्री. दारव्हेकर यांनी मनोगत केले. प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

दिव्यांग बांधवांची गायन स्पर्धा, एकल आणि समूह नृत्य स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरम या गीतावर समूह नृत्य सादर केले. अबोली जरीत प्रथम, प्रवीण मिश्रा द्वितीय तर कुमारी शबाना यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.

एकल नृत्य स्पर्धेमध्ये सृष्टी बेडेकर प्रथम, कार्तिक नागुलवार द्वितीय तर अन्यना थुटे हिने तृतीय क्रमांक पटकाविला. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात दिव्यांग मुला-मुलींच्या वेशभूषा स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये अनुक्रमे सागर मेश्राम प्रथम यशस्वी बोरकर द्वितीय आणि कल्याणी बागडे हिने तृतीय क्रमांक पटकाविला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीआरसी केंद्राचे संचालक प्रफुल शिंदे यांनी केले तर संचालन दिनेश मासोदकर यांनी केले. उपस्थितांचे आभार जगन मुदगडे यांनी मानले.