Published On : Fri, Jun 29th, 2018

नागपुरात बंदुकीच्या धाकावर ५० लाखाची लूट

नागपूर : नागपुरातील जुना भंडारा रोडवर ५० लाख रुपये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. लकडगंज पोलीस स्टेशन च्या हद्दीतील जुना भंडारा रोड वरील शिवम टॉवर च्या जवळ आज सायंकाळी ७.३० च्या सुमारास हि घटना घडली.

शिवम टॉवर मध्ये असलेल्या कोळसा व्यापाऱ्याच्या कार्यालयातील एक कर्मचारी हि रोकड घेऊन मालकाच्या घरी जात होता. दरम्यान शिवम टॉवर च्या बाहेर निघताच तीन लुटारूंनी त्या कर्मचाऱ्याला घेरून त्याला बंदुकीचा धाक दाखविला व रोकड असलेली बॅग हिसकावली. यावेळी लुटारूंनी कर्मचाऱ्याच्या हातावर चाकूने वार केले व ते रोकड असलेली बॅग घेऊन पळून गेले.

राजेश भिसीकर असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. राजेश च्या माहिती नुसार त्या बॅगमध्ये ५० लाख रुपयाची रोकड होती.

संबंधित चोरीची माहिती लकडगंज पोलीस स्टेशन ला देण्यात आली आहे. पोलिसांनी याविषयी तक्रार दाखल करून लुटारूंचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.