Published On : Thu, Dec 7th, 2017

‘साई’साठी ४२ घरे तोडली; वाठोडात तणाव

Advertisement
demolition

File Pic

नागपूर: वाठोडा येथे उभारण्यात स्पोर्ट अथॉरीटी ऑफ इंडियासाठी जागा रिकामी करण्याची कारवाई मनपाने सुरू केली आहे. बुधवार ६ डिसेंबरला मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करीत ४२ पक्के घरे जमीनदोस्त केली. या कारवाईदरम्यान प्रचंड विरोध करण्यात आला. पथकावर हल्लाही करण्याचा प्रसंग उद्भवला होता. मात्र, कारवाई करण्यात आली. याप्रकरणी विरोध करणाऱ्या १४ जणांविरूध्द शासकिय कामात व्यत्यय आणण्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.११ जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतले.

वाठोडातील ​गिडोबा मंदिराजवळ असलेल्या घरांवर ही कारवाई करण्यात आली. या जागेवरील १४० एकर परिसरात ‘साई’चे केंद्र उभारले जाणार आहे.यासाठी येथील ४२ घरे रिकामे करण्यासाठी नेहरूनगर झोनने नोटीस बजावली. २७ ऑक्टोबरला नोटीस मिळाल्यानंतर या नागरिकांनी पुन्हे पक्के घर बांधण्यास सुरूवात केली. नेहरूनगर झोनतर्फे त्यांना समज दिली. मात्र, त्यांनी बांधकाम सुरूच ठेवले.त्यामुळे झोनतर्फे मनपा मुख्यालयात ही माहिती देण्यात आली. त्यानंतर आज ही घरे पाडण्याची कारवाई करण्यात आली. दुपारी १२ वाजता कारवाईस सुरूवात करण्यात आली. कारवाईदरम्यान या घरमालकांनी विरोध दशविला. पथकाचे वाहन अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे पथक व नागरिकांमध्ये वादावादी झाली. वाद वाढत गेला. तणावही वाढला. काहींनी कारवाई न करण्यासाठी दबाव वाढविला. आरडाओरड केली. कारवाईदरम्यान अडथळेही आणले गेले. त्यामुळे कारवाईत सहभागी असलेल्या नंदनवन पोलिसांच्या पथकाने अडथळा निर्माण करीत असलेल्यांना ताब्यात घेतले. १४ जणांनी प्रत्यक्ष कारवाईदरम्यान अडथळा आणला.

या सर्वांवर सरकारी कामात व्यत्यय आणत असल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आला. यातील ११ जणांना ताब्यात घेऊन कारवाईही पूणं करण्यात आली. मोकळी करण्यात आलेली जागा ‘साई’च्या ताब्यात देण्यात आली. अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील, प्रवर्तन अधिक्षक यादव जांभुळकर, प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे, पथक प्रमुख मंजूर शाह, नितीन मंथनवार, प्रकाश पाटील, मोहरीर संजय शिंगणे, जमशेद अली यांच्यासह नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक पोलिस आयुक्त कापगते, नंदनवनचे पोलिस निरीक्षक एम.डी.नलावडे व पथक सहभागी झाले होते.