नागपूर :नागपूर शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ क्र. ०१ मध्ये यंदाचा गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने आणि पर्यावरणपूरक रीतीने साजरा करण्यात आला. या दरम्यान एकाही गणेश मंडळाने डीजे किंवा प्रचंड ध्वनीप्रदूषण करणाऱ्या साउंड सिस्टीमचा वापर न करता, पारंपरिक वाद्यांच्या तालावर भक्तिभावाने गणरायाची आराधना केली.
उत्सवाच्या काळात नियमांचे काटेकोर पालन करून सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत आदर्श उत्सव साजरा करणाऱ्या अशा ४० गणेश मंडळांचा सत्कार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयए सभागृहात करण्यात आला. पोलीस उप आयुक्त (परिमंडळ क्र. १) श्री. सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी यांच्या हस्ते मंडळ पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र व रोपटी प्रदान करण्यात आले.
सन्मानित मंडळांमध्ये एमआयडीसी, प्रतापनगर, सोनेगाव, बजाजनगर आणि हिंगणा परिसरातील अनेक मंडळांचा समावेश आहे. यामध्ये शिव गणेश उत्सव मंडळ (साईनगर), अष्टविनायक एम्पायर गणेश उत्सव मंडळ (वानाडोंगरी), संघर्ष गणेश उत्सव मंडळ (कंट्रोल वाडी), नवनिर्माण गणेश उत्सव मंडळ (प्रतापनगर), पावनभुमी गणेशोत्सव मंडळ, महाराष्ट्र कास्मो पॅलिटन गणेश मंडळ, ब्लूमडेल सांस्कृतिक मंडळ, सिध्दीविनायक मित्र मंडळ, अमर गणेश सांस्कृतिक मंडळ, श्री गणराज युवा मंडळ, शिवशक्ती युवा मंडळ यांसह इतर मंडळांचा समावेश आहे.
या उपक्रमामुळे “आनंद साजरा करतानाच पर्यावरण व सामाजिक जबाबदारी सांभाळली जाऊ शकते” हा संदेश समाजात पोहोचला. पोलिसांनी केलेल्या या सन्मानामुळे गणेश मंडळांना पुढील वर्षीही प्रदूषणमुक्त आणि आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.
नागपूरकरांच्या या सामूहिक जबाबदारीचे आणि सजगतेचे कौतुक शहरभर होत आहे.