Published On : Thu, Mar 26th, 2020

राज्यात करोना बाधित ३ नवीन रुग्ण

Advertisement

मुंबई: राज्यात आज कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची नोंद झाली असून गुरूवार संध्याकाळपर्यंत राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या १२५ झाली आहे. मुंबई, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, राज्यात आज एकूण २६९ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

गोवंडी येथील मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणारी एक ६५ वर्षीय महिला टंडन हॉस्पिटल, डी वाय पाटील हॉस्पिटल अशा दोन रुग्णालयांकडून संदर्भित होऊन वाशी येथील जनरल हॉस्पिटल येथे अत्यंत गंभीर अवस्थेत दिनांक २४ मार्च रोजी दुपारी भरती झाली. तिचा त्याच दिवशी रात्री मृत्यू झाला. ती करोना बाधित असल्याचे प्रयोगशाळा अहवालावरुन काल स्पष्ट झाले. तिच्या परदेश प्रवासाबाबत अथवा इतर संपर्काबाबत माहिती घेण्यात येत आहे.
आजच्या नवीन बाधित रुग्णांपैकी सिंधुदुर्गचा रुग्ण हा एका करोना बाधित रुग्णाचा सहवासित असून त्याने या रुग्णासोबत एकाच डब्यातून रेल्वे प्रवास केल्याचे समजते. नागपूरच्या बाधित रुग्णाने दिल्ली येथे प्रवास केला होता पण त्याने परदेश प्रवास केल्याचे स्पष्ट झालेले नाही.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील असा:

पिंपरी चिंचवड मनपा -१२
पुणे मनपा -१८
मुंबई-४९
सांगली-९
नवी मुंबई , कल्याण डोंबिवली ६
नागपूर- ५
यवतमाळ ४
अहमदनगर, ठाणे प्रत्येकी -३
सातारा, पनवेल प्रत्येकी -२
उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार,पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग प्रत्येकी १
एकूण-१२५
मृत्यू -४

१८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ३२४३ जणांना भरती करण्यात आले. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी २७५० जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १२५ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत.