Published On : Thu, Mar 26th, 2020

वृत्तपत्र वितरणाचे काम त्वरीत सुरु करण्यात यावे – पालकमंत्र्यांचे आवाहन

Advertisement

विदर्भ डेली न्यूज पेपर असोसिएशन व हॉकर्सची संयुक्त बैठकीत चर्चा

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्रांचे वितरण आवश्यक असून जिल्हयातील वृत्तपत्र हॉकर्सनी दैनंदिन वृत्तपत्राचे वाटप सुरु करावे असे आवाहन पालकमंत्री डॉ.नितिन राऊत यांनी केले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री डॉ.नितिन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ डेली न्युज पेपर्स असोसिऐशन व स्थानीक वृत्तपत्र वितरण करणारे हॉकर्स प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते.

विदर्भ डेली न्युज पेपर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृण चांडक, नागपूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष रमेश नागलकर याचेसह विविध वृत्तपत्राचे प्रबंध संपादक उपस्थित होते. बैठकीस विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालीका आयुक्त आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त विभागीय आयुक्त अभिजित बांगर, पोलिस अधीक्षक राकेश ओला, माहिती संचालक हेमराज बागुल, दैनिक लोकमत वृत्तपत्र समुहाचे प्रबंध संपादक विजय दर्डा, दैनिक हितवादचे राजेंद्र पुरोहित, दैनिक नवभारतचे निमिष माहेश्वरी, दैनिक भास्करचे सुमीत अग्रवाल माजी मंत्री सतीश चतुर्वेदी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी माध्यमांची भूमीका अत्यंत महत्वाची असल्यामुळे नागपूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या प्रतिनीधींनी सकारात्मक भूमिका घेऊन वृत्तपत्राचे वितरण सुरु करावे. वृत्तपत्र वितरण करतांना संसंर्ग टाळण्याच्या दृष्टीने साबणाने हात धुणे, मास्क लावणे त्यासोबत योग्य अंतर ठेवणे आदी खबरदारी आवश्यक आहेत. प्रशासनाच्या वतीने सर्व केंद्रावर अंतर ठेवण्याबाबत महापालिका प्रशासनाकडुन योग्य त्या उपाय योजना कराव्यात.

याप्रसंगी हॉकर्स प्रतिनिधींना आपल्या भूमिका मांडली त्यात सद्यस्थितीत हॉकर्स प्रतिनिधीची स्वत:ची सुरक्षा, तसेच कॉलनी, अपार्टमेंटस् इतर भागातील नागरिकांनी वृत्तपत्रे घेण्यास नकार दिल्याचे सांगितले. हॉकर्सला कोरानाच्या पार्श्वभूमीवर वैयक्तीक काळजी घ्यावी लागणार आहे. वृत्तपत्र वितरणाच्या वेळी सामाजिक अंतर ठेवावे लागेल, चौकात वितरण करताना वाहतूकीस अडथळा होणार नाही याची खात्री करुन घ्यावी लागेल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपातकालिन परिस्थिती लक्षात घेता वृत्तपत्र हे समाजासाठी अत्यंत महत्वाचे माध्यम आहे. वृत्तपत्रामुळे करोना होत नाही त्यामुळे जनतेने आपल्या घरी वृत्तपत्र विक्रेत्याला येऊ द्यावे असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. हॉकर्स प्रतिनिधींच्या वैयक्तिक आरोग्यासंदर्भात वृत्तपत्र मालकांनी बैठक घेऊन त्यांना आवश्यक ती सुरक्षा प्रदान करावी. हॉकर्स प्रतिनिधींच्या सुरक्षा विषयक/ कामकाजाविषयक स्थानिक स्वरुपाच्या मागण्यासंदर्भात जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन आवश्यक ते सहकार्य करेल असे त्यांनी निर्देश दिले.