Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Jan 22nd, 2019

  बचत गटाच्या माध्यमातून 35 हजार महिलांना मिळाला रोजगार-अश्विन मुदगल

  नागपूर : महिलांची क्षमता ओळखून त्यांच्यात कौशल्य विकसीत केल्यामुळे आज बचत गटाच्या माध्यमातून 35 हजार महिलांच्या उद्योजकीय क्षमतेत वाढ होत असून प्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज केले.

  विविध शासकीय योजनांची माहिती बचत गटातील महिलांना व्हावी, यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनामध्ये “कृती संगम कार्यशाळा”आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

  यावेळी मत्सव्यवसाय सहाय्यक आयुक्त समीर परवेझ, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी श्रीमती ललिता दारोकर, विभागीय कार्यक्रम अधिकारी राजू इंगळे, सहायक जिल्हा समन्वयक अधिकारी सचिन देवतळे आदी मान्यवर उपस्थित होते.

  यावेळी महात्मा फुले विकास महामंडळ, समाज कल्याण विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, मातंग समाज महामंडळ, हस्तकला विभाग, कृषी विभाग, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, पशुसंवर्धन विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी शासकीय विविध योजनांची माहिती बचत गटातील महिलांना सादरीकरणाद्वारे दिली.

  कार्यशाळेतील बचत गटातील महिलांना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले, महिला आर्थिक विकास महामंडळ ही महिला विकासाची राज्यस्तरीय शिखर संस्था म्हणून काम करते. महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने महिलांची सामाजिक, आर्थिक स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. आज 35 हजारपेक्षा जास्त महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार प्राप्त झाला आहे. बचत गटामध्ये महिला संघटीत झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांचे सक्षमीकरण किती प्रमाणात झाले हे महत्वाचे आहे. केवळ बचत गटाची स्थापना करणे हा उद्देश नसून खऱ्या अर्थाने महिलांना संघटीत करुन त्याची क्षमता वाढविणे, त्यांच्या क्षमतेनुसार काम देणे, त्यांच्या क्षमतेचा विकास करणे यावर महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने महत्वपूर्ण कामगिरी बजावित आहे. महिलांमध्ये उद्योजिकता वाढविण्यासाठी इतर शासकीय विभागाने महिला आर्थिक विकास महामंडळाला सहकार्य करावे ,असे आवाहनही त्यांनी केले.

  वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी श्रीमती ललिता दारोकर यांनी प्रास्ताविकेत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने महिला सक्षमीकरणाच्या कामाची माहिती दिली. नागपूर जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत ग्रामीण भागात 217 गावात 1634 गटातील 20884 महिला तसेच शहरी भागात अल्पसंख्यांक व दीनदयाल अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत 11 नगर परिषदांमध्ये 1141 गटातील 12234 महिलांसोबत काम सुरु आहे. विविध शासकीय योजनांची माहिती महिलांना व्हावी जेणेकरुन त्यांना गावात रोजगार निर्मिती करता येईल, याबाबत मार्गदर्शन आणि अनुदानासंबंधी माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  यावेळी क्षेत्रिय समन्वयक, लोकसंचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक, क्षेत्रीय क्षमता वृद्धी समन्वयक, उपजिविका समन्वयक, सहयोगिनी, लोकसंचालित साधन केंद्राच्या कार्यकारी संचालक, बचत गटातील प्रतिनिधी, महिला उपस्थित होत्या.

  हिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानातील शहर समृध्दी उत्सवअंतर्गत कृती संगम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145