Published On : Wed, Oct 9th, 2019

दीक्षाभूमी परिसरातून ४५० टन कचरा संकलित

Advertisement

मनपातर्फे २४ तास अविरत सेवा प्रदान : तीन दिवस अधिकारी, कर्मचारी तैनात

नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणा-या लाखो बौद्ध बांधवांच्या सुविधेसाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे सोमवार (ता.७), मंगळवार (ता.८) व बुधवार (ता.८) हे तीन दिवस अविरत सेवा प्रदान करण्यात आली. मनपा आयुक्तांच्या निर्देशावरुन करण्यात आलेल्या या सेवाकार्यातून स्वच्छता विभागातर्फे दीक्षाभूमी परिसरातून तीन दिवसात ४५० टन कचरा संकलित करण्यात आला. कनक रिसोर्स मॅनेजमेंटच्या वतीने या कच-याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणा-या बौद्ध बांधवांच्या सुविधेबाबत मनपा आयुक्त अभिजीत बांगर विशेष लक्ष देत प्रत्येक सुविधेची वेळोवेळी पाहणी करुन त्याचा आढावा घेतला. तिन्ही दिवस आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दीक्षाभूमी व परिसरातील सुविधेची पाहणी करुन आढळलेल्या त्रुट्या तातडीने दुरूस्त करुन घेतल्या. नागरिकांना २४ तास अविरत सेवा मिळावी यासाठी आयुक्तांच्या निर्देशावरुन विविध विभागाचे अधिका-यांनीही २४ तास कर्तव्य बजावले.

अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, कार्यकारी अभियंता धनंजय मेंढुलकर, कार्यकारी अभियंता ए.एस.मानकर, कार्यकारी अभियंता अविनाश बारहाते, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.सुनील कांबळे, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, स्वच्छ सर्वेक्षणचे नोडल अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, अतिरिक्त सहायक आरोग्य डॉ. विजय जोशी, कनकचे व्यवस्थापक कमलेश शर्मा, सर्व झोनचे झोनल अधिकारी, सर्व आरोग्य निरीक्षक, स्वच्छता कर्मचारी यांनी तिन्ही दिवस अविरत सेवा प्रदान करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली.

दीक्षाभूमीवर येणा-या अनुयायांच्या सुविधेकरीता मनपातर्फे नियंत्रण कक्ष उभारण्यात आले. या नियंत्रण कक्षाद्वारे सर्व सुविधांकडे लक्ष ठेवून नागरिकांना भेडसावणा-या अडचणीही सोडविण्यात आल्या. धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी सोमवार (ता.७)पासूनच बौद्ध बांधवांचे दीक्षाभूमीवर आगमन झाले. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने परिसरात चोविस तास स्वच्छता ठेवण्याचे आयुक्तांनी सक्त निर्देश दिले. त्यानुसार मनपाचे प्रतिदिन ५०० कर्मचारी तैनात करण्यात आले. याशिवाय कनकचे १२५ कर्मचारी व कचरा संकलन करणा-या ३० गाड्या सेवेमध्ये लावण्यात आल्या. दीक्षाभूमी परिसरात महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र तात्पुरती ८०० प्रसाधनगृह तयार करण्यात आली. या प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेसाठी ९० कर्मचारी नियुक्त करण्यात आले. याशिवाय परिसरात चार फिरते प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याचे २०० तात्पुरते नळ, मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे वैद्यकीय सेवा, अग्निशमन सुविधा, परिवहन सेवा आदी प्रदान करण्यात आल्या.

दीक्षाभूमी परिसरात लावण्यात आलेल्या एल.ई.डी. स्क्रीन, बॅनर, फलक आदींद्वारे ‘सिंगल यूज प्लास्टिक मुक्ती’बाबत जनजागृती करण्यात आली. या शिवाय या स्क्रीन आणि फलकांद्वारे मदतीसाठी उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षांचे क्रमांक दर्शविण्यात आले. दीक्षाभूमीच्या संपूर्ण परिसरातील स्टॉल्सपुढे कचरा पेट्यांची व्यवस्था करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षा व सुविधेसह मनपाच्या स्वच्छता कर्मचा-यांच्या सुरक्षेसाठी त्यांना जॅकेट, हँड ग्लोज, गम बुट, मास्क आदी साहित्य प्रदान करुन ते परिधान करुनच सेवा बजावण्याचे आयुक्तांतर्फे निर्देशित करण्यात आले. याशिवाय देशाच्या विविध भागातून येणा-या अनुयायांच्या सुविधेसाठी मनपाच्या परिवहन विभागातर्फे ‘आपली बस’ची विशेष सेवा पुरविण्यात आली. रेल्वे स्टेशन, बस स्थानक, बर्डी आदी ठिकाणाहून थेट दीक्षाभूमीसाठी बस सेवा प्रदान करण्यात आली.

दीक्षाभूमीवर येणा-या अनुयायांसाठी विविध संस्था आणि नागरिकांकडून मोफत भोजनदान केले जाते. भोजनदान करण्यात येणा-या ठिकाणी घाण होउ नये यासाठीही मनपाच्या स्वच्छता कर्मचा-यांतर्फे नियमीत स्वच्छता करण्यात आली. दीक्षाभूमीकडे येणारे रहाटे कॉलनी, नीरी रोड, लक्ष्मीनगर, काचीपूरा रामदासपेठ अशा सर्व मार्गांची नियमीत स्वच्छता करण्यात आली. बुधवारी (ता.९) सर्व मार्गांची स्वच्छता करुन सायंकाळपर्यंत सर्व मार्ग वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.

मनपा कर्मचा-यांसह विविध स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयांचे विद्यार्थी, आंबेडकरी अनुयायांनी सुद्धा बौद्ध बांधवांच्या सुरक्षा व सुविधेसाठी महत्वाचे कार्य केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement