Published On : Sun, Apr 24th, 2022

औरंगाबाद जिल्ह्यात 2024 पर्यंत 25 हजार कोटींचे महामार्ग बांधणार

Advertisement

5 हजार कोटींच्या महामार्गांचेना. गडकरींच्या हस्ते लोकार्पण, भूमिपूजन

नागपूर/औरंगाबाद :मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील महामार्गांच्या विकासामुळे या भागातील विकासाचे चित्रच बदलणार असून येत्या 2024 पर्यंत 25 हजार कोटींचे महामार्ग या एका जिल्ह्यात बांधून पूर्ण करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिले.

औरंगाबाद येथे 3317 कोटी रुपये किमतीच्या 4 महामार्गांचे प्रकल्पाचे लोकार्पण व 2253 कोटी किमतीच्या 4 महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन आज ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्य शासनाचे मंत्री अब्दुल सत्तार, ना. सांदिपन भुमरे, आ. संजय सिरसाट, हरिभाऊ बागडे, अनिल सावे, चंद्रकांत खैरे व अन्य उपस्थित होते.

या कार्यक्रमात ना. गडकरी म्हणाले- 2014 नंतर आतापर्यंत महाराष्ट्रात 12524 किमीचे नवीन महामार्ग घोषित करण्यात आले आहेत. आता राष्ट्रीय महामार्गाची लांबी 18224 किमी झाली आहे. गेल्या 7 वर्षात महामार्गाच्या कामासाठी महाराष्ट्रात 1 लाख 2 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 2014 पर्यंत फक्त 145 किमी महामार्ग होते. त्यानंतरच्या काळात 450 किमी महामार्गाची लांबी झाली आहे. 600 किमी महामार्गाच्या नवीन कामांना मंजुरी देण्यात आली असून 13 कामे पूर्ण झाली आहे. मी जलसंधारण मंत्री असताना या भागातील 16 सिंचन प्रकल्पांना निधी दिला असून त्याची कामे अजूनही सुरु आहेत. मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व धार्मिक तीर्थस्थळे जोडण्यासाठी प्रयत्न केले. तसेच पर्यटनस्थळेही जोडण्याचा प्रयत्न केला असल्याचेही ते म्हणाले.

13500 घनमीटर पाणी साठवणूक क्षमता

औरंगाबाद जिल्ह्यात महामार्गांची कामे करताना लागणारा मुरुम-माती खोदून रस्त्यांसाठी वापरताना आडगाव व गांधेली रस्त्यासाठी 6 लाख घनमीटर, वाल्मी व नक्षत्रवाडी रस्त्यासाठी 4 लाख घनमीटर व तिसगाव ते साजापूर या रस्त्यासाठी 3 लाख 50 हजार घनमीटर उत्खनन केल्यामुळे 13500 घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. यामुळे परिसरातील पाण्याचे स्रोत जिवंत होऊन पाणीटंचाईपासून दिलासा मिळणार आहे.

औरंगाबाद शहरातही डबल डेकर फ्लायओव्हर बांधण्याची घोषणाही ना. गडकरी यांनी यावेळी केली. तसेच मेट्रो प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्याचे कामही सुरु आहे. याच कार्यक्रमात ना. सांदिपान भुमरे, ना. भागवत कराड, ना. रावसाहेब दानवे, ना. अब्दुल सत्तार यांचेही भाषण झाले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक संचालक राजेश अग्रवाल यांनी केले.