Published On : Thu, Apr 5th, 2018

वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीस २५ हजारांची मदत

Advertisement

मुंबई : आपल्या एकुलत्या एक मुलाचा वाढदिवस धुमधडाक्यात व्हावा… अशी अनेक पालकांची इच्छा असते…यासाठी अनेक पालक लाखो रुपये खर्च करताना आपण समाजात पाहतो. मात्र समाजात सामाजिक जाणीव असणारी माणसे आजही आहेत, याचं ठळक उदाहरण अंबेजोगाईचा १० वीची परीक्षा दिलेला सम्यक सचिन कर्णावट. त्याने सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी खारीचा वाटा उचलला आहे. आपल्याला दिलेल्या खाऊच्या पैशाची व पॉकेटमनीची बचत करून तब्बल २५ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वर्षा निवासस्थानी आज सुपुर्द केला.

अवघ्या १६ व्या वर्षात सामाजिक बांधिलकी जपल्याचा आनंद सम्यकच्या चेहऱ्यावर दिसत होता. सम्यकने सध्या १० वीची परीक्षा दिली असून बालवयापासूनच तो सामाजिक बांधिलकी जपतोय. गेल्या १० वर्षांपासून तो वाढदिवस साजरा न करता खाऊच्या पैशातून अनाथाश्रम व वृद्धाश्रमात मिठाई वाटपाबरोबर विविध वस्तू देत आहे. अनाथ मुलांच्या व वृद्धांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम तो न चुकता करतोय, यात त्याच्या वडिलांचं योगदान खूप मोठं आहे. सम्यकचे वडील सचिन कर्णावट हे आपला छोटासा ऑप्टिकल दुकानाचा व्यवसाय सांभाळून मुलाला सामाजिक बांधिलकीची शिकवण देत आहेत.

मागील वर्षी सम्यकने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या फेसबुक पेजवर एका लहान मुलाने वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधी दिल्याचा फोटो पाहिला होता. हा फोटो पाहून सम्यकची सामाजिक बांधिलकी गप्प बसू देईना, त्यातूनच ही प्रेरणा मिळाल्याचं त्याने सांगितलं. त्याने वडिलांना ही कल्पना सांगितली, वडिलांनीही त्यास मान्यता दिली. आपणही असाच निधी देऊ शकतो, या कल्पनेनेचं त्याला आनंद झाला. त्याचे वडील सचिन यांनी मुख्यमंत्री साहेबांच्या फेसबुक पेजवर संदेश पाठवून सविस्तर माहिती देऊन भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांना भेटीचे निमंत्रण दिले होते.

राज्यात विकासकामाचा धडाका लावलेल्या मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून सामाजिक कामात भाग घेतल्याचा आनंद कर्णावट कुटुंबियांनी व्यक्त केला. सम्यकबरोबर त्याचे वडील, आई व बहीणही आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सम्यकला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसाचा खर्च हा वायफळ आहे. या पैशातून अनेकांचे आयुष्य बदलता येवू शकते. आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेने आपण वागले पाहिजे. सामाजिक भान ठेवून अनाथ, वृद्ध, गरजूंना मदत केली पाहिजे.