Published On : Thu, Apr 5th, 2018

फिक्की महिला संघटनेच्यावतीने महाराष्ट्रातील ३ महिलांचा सन्मान

Advertisement

नवी दिल्ली : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री (फिक्की) च्या महिला संघटनेच्यावतीने आज महाराष्ट्रातील विशेष महिला उद्योजक कमल कुंभार, लेखक, स्तंभकर, चित्रपट निर्माती तसेच इंटेरीयर डिझायनर ट्विंकल खन्ना, चित्रपट आणि दूरचित्रवाणी निर्माती एकता कपूर यांना आज दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.

येथील विज्ञान भवनात फेडरेशन इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री (फिक्कीच्या)च्या महिला संघटनेच्या ३४ व्या सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील ३ महिलांचा समावेश होता. या कार्यक्रमास राष्ट्रपती रामनाथ कोविंद, फिक्कीचे अध्यक्ष रमेश शाह, फिक्कीच्या महिला संघटनेच्या अध्यक्षा वासवी भारतराम आदी मंचावर उपस्थित होते. यासह विविध उद्योगक्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. राष्ट्रपती श्री कोविंद यांनी यावेळी उपस्थित महिला उद्योजकांना संबोधित केले.

फिक्कीचे अध्यक्ष रमेश शाह यांच्या हस्ते सर्व महिला उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. ग्रामीण महिला उद्योजक कमल कुंभार या उस्मानाबाद जिल्ह्यातील हिंगळजवाडी येथील आहेत. त्यांनी २००० रूपयांच्या गुंतवणूकीतून बांगड्याचा व्यवसाय सुरू केला होता. स्वंयम शिक्षण प्रयोग या गैरसरकारी संस्थेच्या संपर्कात येऊन त्यांनी उद्योगाशी संबंधित विविध प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणाचा लाभ इतर ग्रामीण महिलांनाही दिला. त्यांनी हजारो ग्रामीण महिलांना उद्योजक बनविले आहे. त्यांच्या या कामाची दखल फिक्कीच्या महिला संघटनेने घेतली असून आज त्यांना सन्मानित केले.

प्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांनी एक नव्हे तर विविध क्षेत्रात स्वत:ला आजमावले असून प्रत्येक क्षेत्रात यशाची शिखरे गाठली आहेत. स्तंभकार, चित्रपट निर्माती, लेखिका म्हणूनही आज त्या प्रसिद्ध आहेत त्यांचा मि. फनीबोन्स, द लेजंड लक्ष्मी प्रसाद या पुस्तकांनी विक्रमी विक्री झालेली आहे. यासह त्या इंटेरियर डिझायनरही आहेत. त्यांच्या वैविध्यपूर्ण कामाची दखल घेत आज त्यांना सन्मानित करण्यात आले.

सुप्रसिद्ध चित्रपट आणि दूरचित्रवाणी निर्माती एकता कपूर यांनी वयाच्या १९ व्या वर्षापासून चित्रपटसृष्टीत आपली कारर्कीद सुरू केली असून त्यांच्या टीव्ही मालिकांनी महिलांना अक्षरश: वेड लावले. त्या अनेक गाजलेले चित्रपटांच्या निर्मात्याही आहेत. त्यांच्या चित्रपटसृष्टी आणि दूरचित्रवाणीच्या अतुलनीय योगदानासाठी आज त्यांना गौरविण्यात आले.