Published On : Wed, Oct 24th, 2018

लाँड्रीसहित लघुउद्योगांसाठी नेट मीटरिंगच्या ऊर्जा प्रकल्पास 25 टक्के सवलत – ऊर्जामंत्री बावनकुळे

Advertisement

पुणे: लाँड्री व्यवसायासह 1 ते 20 किलोवॅट सौर ऊर्जेच्या नेटमीटरिंग प्रकल्पास महाऊर्जातर्फे 25 टक्के सवलत दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी केली. दरम्यान, महाऊर्जा नियामक मंडळाच्या बैठकीतही 1 ते 20 किलोवॅट सौर ऊर्जेच्या नेटमीटरिंग प्रकल्पास 25 टक्के सवलतीचा ठराव घेण्यात आला व त्यास बावनकुळे यांनी लगेच मंजुरी दिली.

येथील बालगंधर्व रंगमंदिरात पुणे जिल्हा लाँड्री व्यावसायिकांकडून ऊर्जामंत्री यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, लाँड्री व्यावसायिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेशनाना नाशिककर, महाराष्ट्र धोबी/परिट महासंघाचे अध्यक्ष देवराज सोनटक्के, अनिल शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले की, 1 ते 20 किलोवॅट वीज नेटमीटरिंगद्वारे वापरणारे परिट समाजासह मत्स्य व्यावसायिक, पशुसंवर्धनाचे प्रकल्प, महिला बचत गटाचे लघु उद्योग, लघु प्रकल्प, पीठ गिरण्या अशा लहान व्यावसायिकांसाठी ही 25 टक्के सवलत महाऊर्जातर्फे देण्यात येणार आहे. तसेच मुद्रा बँकेकडून कर्ज घेऊन व्यवसाय करणाऱ्या लघुउद्योगांचाही यात समावेश असेल. ही सवलत देण्यामुळे रोजगार निर्मितीवर भर दिली जाणार आहे.

या संदर्भात सविस्तर ठराव महाऊर्जाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. या निर्णयाचे परिट समाज संघटना तसेच लाँड्री व्यावसायिक संघटनांनी स्वागत केले असून लघुउद्योगांनाही या निर्णयामुळे चांगला दिलासा मिळणार आहे.