Published On : Mon, Oct 14th, 2019

हुडकेश्वरला 2 वर्षात 24 तास पाणी : नितीन गडकरी

जुना नाका येथे जाहीरसभेला 10 हजारावर नागरिकांची उपस्थिती

नागपूर : सन 1995 मध्ये मी पालकमंत्री झालो तेव्हा या भागात रस्ते, पाणी नव्हते. अत्यंत तीव्र समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत होते. पण चंद्रशेखर बावनकुळे हे या भागाचे आमदार झाले आणि त्यांनी या भागाचे चित्रच बदलवून टाकले. विकासाचे राजकारण करणारे आम्ही आहोत. आता अनेक समस्या सुटल्या आहेत. पाण्याचा प्रश्नही सुटला आहे. असे असले तरी येत्या 2-3 वर्षात हुडकेश्वर भागाला 24 तास पाणीपुरवठा करणार असल्याचे जाहीर आश्वासन केंद्रीय महामार्ग वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी जनतेला दिले.

हुडकेश्वरच्या जुना नाका येथे कामठी विधानसभा भाजपा-शिवसेना, रिपाई, बरिएमंचे उमेदवार टेकचंद सावरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीरसभेला ते संबोधित करीत होते. 10 हजारावर नागरिकांनी या सभेला गर्दी केली होती. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रुपराव शिंगणे, टेकचंद सावरकर, अजय बोंढारे, अनिल निधान, रमेश चिकटे, डीडी सोनटक्के, भगवान मेंढे, शुभांगी गायधने, नगरसेविका स्वाती आखतकर, रंजना धांडे, श्रीमती मडावी उपस्थित होते.

नागपूर शहराचा झपाट्याने विकास होतो आहे. अजनी स्टेशन आता जागतिक दर्जाचे होते आहे. 1700 कोटी खर्चून नवीन रिंग रोड होतो आहे. सिम्बॉयसिस विद्यापीठ येथे आले आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण आपल्या जिल्ह्यातील मुलांना मिळणार आहे. 25 टक्के प्रवेश आपल्यासाठी राखीव आहेत आणि 15 टक्के शिक्षण शुल्कात सवलत मिळणार आहे. मिहानमध्ये मोठमोठ्या कंपन्या आल्या आहेत. एम्स, ट्रीपल आयटीआय, आयआयटी अशा मोठ्या संस्था आल्या आहेत. 50 हजार युवकांना येत्या 5 वर्षात रोजगार प्राप्त होणार आहे. झपाट्याने या शहराचा विकास होत आहे. सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचे प्रभावी उपकरण म्हणून राजकारणाचा आम्ही उपयोग करीत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

समाजातील शेवटचा माणूस, शेतकरी यांचा विकास करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. ती आम्ही पूर्ण करणारच आहे, असे सांगताना गडकरी म्हणाले- एवढी कामे सुरु आहेत की त्याची मोजदाद आता करता येणार नाही. 350 खेळांच्या मैदानांची दुरुस्ती सुरु आहे. खासदार क्रीडा महोत्सव, खासदार सांस्कृतिक महोत्सवामुळे या शहराच्या सांस्कृतिक प्रगतीत वाढ झाली आहे. शहराचा चौफेर विकास होत आहे. तुम्ही माझ्यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री बावनकुळे यांच्यावर विश्वास टाकला. आता विकास करणे आमची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

पालकमंत्री बावनकुळे
गेल्या 15 वर्षापासून या मतदारसंघात मी काम करीत आहे. रस्ते, पाणी, पूल ही कामे सुरु आहेत. दोन वर्षात 250 कोटींची कामे या मतदारसंघात झाली आहे, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. पुढच्या पाच वर्षात आणखी विकास कामे आणि निधी आणण्याची जबाबदारी माझी आहे. मी याच मतदारसंघात पूर्णवेळ काम करणार आहे. काँग्रेसला मत म्हणजे मतदारसंघ 15 वर्षे मागे नेण्यासारखे आहे. त्यामुळे येत्या 21 तारखेला भाजपा उमेदवार टेकचंद सावरकर यांच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना मोठ्या फरकाने विजयी करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

बावनकुळेंचा मानसन्मान, प्रतिष्ठा जपली जाणारच
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मानसन्मान आणि प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी माझी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असल्याचे सांगून नितीन गडकरी म्हणाले- त्यांना यापेक्षाही मोठी जबाबदारी मिळणार आहे. ऊर्जामंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राभर काम करून जी ओळख त्यांना मिळाली हे त्यांचे कर्तृत्व आहे. आज त्यांनी 5 लाख शेतकर्‍यांना वीज कनेक्शन दिल्यामुळे आत्महत्या थांबल्या असा गौरवपूर्ण उल्लेखही नितीन गडकरी यांनी यावेळी केला.