Published On : Mon, Feb 10th, 2020

23 व्या ई -गव्हर्नन्स परिषदेचा मुंबईत समारोप

– ई-गव्हर्नन्स ही देशाच्या भविष्यातील प्रगतीची गुरुकिल्ली

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह

मुंबई – देशाच्या सुप्रशासनासाठी ई-गव्हर्नन्स हा महत्त्वाचा भाग असून तळागाळातील व्यक्तींपर्यंत शासनाच्या सेवा सुविधा तसेच योजनांचा लाभ पोहोचवणे ही खरी या प्रकल्पाची लिटमस टेस्ट आहे. त्यामुळे भारताच्या विकास प्रवासात ई-गव्हर्नन्स ही भविष्यातील गुरुकिल्ली ठरेल असे प्रतिपादन केंद्रीय ईशान्य क्षेत्र विकास, वैयक्तिक, जन तक्रार आणि निवृत्तीवेतन , अणुऊर्जा व अवकाश विभाग तसेच पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी केले. 23 व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचा समारोप आणि आणि ई गव्हर्नन्स तसेच हॅकेथोन पारितोषिक प्रदान समारंभ काल मुंबईत एन.एस. सी. आय. वरळी येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सिंह पुढे म्हणाले,ई-गव्हर्नन्स ही देशाच्या भविष्यातील प्रगतीची गुरुकिल्ली आहे.ई राष्ट्रीय कृषी बाजार किंवा आयुष्मान भारत अशा योजनांसाठी व उत्तम प्रशासनासाठी ई-गव्हर्नन्स आवश्यक आहे. हाती घेतलेल्या प्रकल्पाचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो आहे की नाही , यावरून प्रकल्पाचे यशापयश ठरते. युवकांच्या आशा – आकांक्षा पूर्ण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करून त्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय राज्यमंत्री पुढे म्हणाले, शासनाच्या विविध योजना गरीबांपर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून गरिबांसाठी समर्पित असलेले सरकार ही आपली ओळख सरकारने प्रस्थापित केली आहे. किमान शासन, कमाल प्रशासन ह्या शासनाच्या ध्येयाशी अशा परिषदा सुसंगतच असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय फिन टेक महोत्सव मार्च 2020 मध्ये मुंबईत भरविण्यासाठी केंद्र सरकार राज्य शासनाला संपूर्ण पाठबळ पुरवेल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

मुंबई ही भारताची फिनटेक राजधानी म्हणून विकसित होईल
राज्याचे माहिती-तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, फिन टेक महोत्सव सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलच राज्य आहे. मुंबई ही भारताची वित्तीय तंत्रज्ञानाची राजधानी म्हणून विकसित होईल असा निश्चय केल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासन सुद्धा भारतीय फिन टेक महोत्सव मार्च २०२० मध्ये मुंबईत भरवेल अशी घोषणा त्यांनी केली.

मुंबईत चार व पाच मार्चला इंडिया फिनटेक महोत्सव
मुंबईला फिनटेक स्टार्ट अप हब बनवण्यासाठी येत्या चार आणि पाच मार्च रोजी इंडिया फिनटेक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवात जगभरातील 25 देश सहभागी होणार असून सुमारे पाच हजार प्रतिनिधी येणार आहेत. त्या सोबतच विविध क्षेत्रातील 500 स्टार्ट अप या महोत्सवात सहभागी होणार असून त्यांच्या उद्योगांना चालना मिळण्याची संधी मिळणार आहे. या महोत्सवात विविध क्षेत्रातील 50 तज्ज्ञांचे मार्गदर्शन नवउद्योजकांना लाभणार आहे .त्याच बरोबर तरुणांमध्ये आकर्षण बनलेले फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनासुद्धा या महोत्सवात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले जाणार असल्याची माहिती श्री पाटील यांनी दिली.

ई-गव्‍हर्नन्‍स साठी 23 पारितोषिकांचे वितरण
ई-गव्हर्नन्स साठी पुढाकार घेऊन त्याचे उत्कृष्टपणे कार्यान्वयन करण्यासाठी निरोपाच्या सत्रात राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2020 चे वितरण करण्यात आले. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाला आयुष्मान भारत, पंतप्रधान जन आरोग्य योजनेसाठी शासकीय प्रक्रियेचे पुनराभियांत्रिकीकरण वर्गवारीत सर्वोत्कृष्ट पद्धतीने सादर केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. नागरिक केंद्री वितरण वर्गवारीत हरियाणा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाला अंत्योदय सरल ह्या योजनेसाठी सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. नागरिक केंद्री सेवांसाठी उत्कृष्ट संशोधन करून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात एक उत्कृष्ट उपग्रहावर आधारीत कृषी क्षेत्राची माहिती प्रणाली विकसित केल्याबद्दल रूडकी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेला सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.

बहु उपग्रहीय प्रणालीतून प्राप्त शेती माहितीसाठ्याचा उपयोग करून सुरु केलेल्या प्रकल्पासाठी सत्युक्त अनालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या स्टार्ट अप संस्थेला सुवर्ण पदक प्रदान करून गौरवण्यात आले. तेलंगणा शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने उपयोगात आणलेल्या ‘ई-चीटस’ प्रकल्पाला सुद्धा उगवत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून नाविन्यपूर्ण उपाययोजना ह्या वर्गवारीत सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात आले. हॅकेथन स्पर्धेतील सहा विजेत्यांनाही यावेळी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

परिषदेत 28 राज्ये व 9 केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 1000 प्रतिनिधी परिषदेत सहभागी झाले होते. परिषदेत केंद्र व राज्य सरकारे, उद्योग, शिक्षण , संशोधक व विचार गटातील सर्व हितसंबंधी सहभागी झाले होते.