Published On : Mon, Feb 10th, 2020

“देशाची एकात्मता टिकविण्यात केरळचे योगदान मोठे” : राज्यपाल

Advertisement

तेराशे वर्षांपूर्वी केरळच्या कालडी येथे जन्मलेल्या आद्य शंकराचार्यांनी आपल्या उण्यापुऱ्या बत्तीस वर्षांच्या आयुष्यात देशभ्रमण करून कांचीपुरम, द्वारका, पुरी व बद्रीनाथ येथे मठ स्थापन करून देशाला एकत्र केले. भारतातील लोकांमध्ये भाषा, लिपी, धर्म, पेहराव आदी अनेक भेद असले तरीही आपला देश संस्कृतीच्या धाग्याने घट्ट विणला गेला आहे. हे कार्य शंकराचार्यांमुळे शक्य झाले. त्यामुळे केरळचे भारताच्या एकात्मतेमध्ये मोठे योगदान असल्याचे उदगार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे काढले.

मुंबईमध्ये स्थलांतरित झालेल्या काही मल्याळी लोकांनी सन १९३० साली स्थापन केलेल्या बॉंबे केरळीय समाज या संस्थेच्या स्थापनेला ९० वर्षे पूर्ण झाली. या निमित्त संस्थेतर्फे वर्षभर साजऱ्या केल्या जाणाऱ्या ‘नवती समारोहाचे’ उदघाटन शनिवारी (दि. ८) राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत हिंदू कॉलनी दादर येथील बी.एन.वैद्य सभागृहात झाले त्यावेळी ते बोलत होते.

मल्याळी भाषा व संस्कृती संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या बॉंबे केरळीय समाज संस्थेचे अभिनंदन करताना राज्यपालांनी मातृभाषेच्या शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले. मातृभाषेत शिक्षण देणारे देश खरी प्रगती करतात असे त्यांनी सांगितले.

बॉंबे केरळीय समाज ही केरळबाहेरची सर्वात जुनी मल्याळी संस्था असून सन १९५८ साली माटुंगा येथे संस्थेच्या ‘केरळ भवनम’चे उदघाटन तत्कालीन संरक्षण मंत्री व्ही के कृष्ण मेनन यांनी केले होते. सन १९६२ साली मुंबई महानगर पालिकेने समाजाला शिवाजी पार्क येथे स्पोर्ट्स पॅव्हिलियन साठी जागा दिली. संस्था आज विविध ठिकाणी आयुर्वेद उपचार, पंचकर्म चिकित्सा, वाचनालय, ‘विशाल केरळम’ मासिक, मल्याळी भाषा वर्ग, भरत नाट्यम, मोहिनीअट्टम, कथक नृत्य वर्ग तसेच संगीत वर्ग चालवित आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश कुमार मधुसुदनन यांनी दिली.

बॉंबे केरळ समाजच्या नव्वदी निमित्त केरळचे लोकजीवन व संस्कृती तसेच मुंबईचे जनजीवन दर्शविणाऱ्या गाण्याचे उदघाटन करण्यात आले.

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक सुभाष चंद्रन, सचिव प्रेम राजन नाम्बियार, ‘नवती समारोह’ समितीचे अध्यक्ष डॉ पी.जे. अप्रेन, आयकर विभागातील सह आयुक्त ज्योतीस मोहन आदी उपस्थित होते. यावेळी एका संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले.