Published On : Mon, Apr 28th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात किरकोळ वादातून २२ वर्षीय युवकाची हत्या!

-पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

नागपूर – नागपूर शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. हत्या आणि हिंसाचाराच्या घटनांना आवर घालण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलं आहे. आज सकाळी एका किरकोळ वादातून २२ वर्षीय युवकाची निर्घृणपणे हत्या झाल्याने संपूर्ण शहर हादरून गेलं.

प्राप्त माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे १०:३० वाजता जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तथागत चौक येथे ही हृदयद्रावक घटना घडली. एका आयशर (मिनी ट्रक) चालक आणि कामगार यांच्यात सिग्नलवर गाडी वळवण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला. किरकोळ वादाने क्षणात उग्र स्वरूप धारण केलं आणि या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने खिशातून चाकू काढून अर्जुन अतुल दहाडे (वय २२) याच्यावर सपासप वार केले.

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गंभीर जखमी अवस्थेत अर्जुन याला स्थानिक नागरिकांनी तत्काळ इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. तथागत चौक व आसपासच्या भागात गोंधळाचं वातावरण तयार झालं आणि वाहतूक व्यवस्था कोलमडली.

घटनेची माहिती मिळताच नागपूर शहर पोलीस, गुन्हे शाखा युनिट आणि कपिल नगर पोलिस स्टेशनच्या टीम्स घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. मात्र, बातमी लिहीपर्यंत आरोपी फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत.

या घटनेने पुन्हा एकदा नागपूरमधील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. रविवारी सुट्टी असूनही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना घटनास्थळी हजर राहून पाहणी करावी लागली.

Advertisement
Advertisement