IGMC
नागपूर : शहरातील मेडिकल रुग्णालयाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. मोदी यांच्या होणाऱ्या सोहळ्यासाठी २१ झाडांचा बळी दिला जाणार आहे. इतकेच नाही तर पेईंग वॉर्ड व विद्यार्थी वसतीगृहाच्या नव्या बांधकामासाठीही झाडे तोडली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.मेडिकलने एकूण चारशे झाडे तोडण्याची परवानगी मागितली असून महापालिकेने यावर आक्षेप मागविले आहेत. पर्यावरणप्रेमींनी त्याचा विरोध केला.
पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी २१ झाडे तोडण्यासंदर्भात मेडिकलने महापालिकेला अर्ज केला आहे. त्यांतर पेईंग वॉर्डसाठी ८० खोल्या बांधण्यासाठी ८६ झाडे तर विद्यार्थ्यांसाठी ४०० खोल्यांचे वसतिगृह बांधण्यात येणार असून त्यासाठी १८७ झाडे तोडण्याची परवानगी मेडिकल अर्जात केली आहे.
अर्जानंतर महापालिकेने तपासणी केल्यानंतर कापण्यात येणाऱ्या झाडांची संख्या २९४ पर्यंत कमी करीत १०० झाडे वाचविल्याचा दावा मनपा अधिकाऱ्याने केला. नागपूर महानगर पालिकेचे उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी यासंदर्भात भाष्य केले. मेडिकल प्रशासनाने तीन वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी झाडे तोडण्याकरिता अर्ज केले आहेत. मेडिकलला अद्याप परवानगी दिली नाही. मेडिकलच्या अर्जावर नागरिकांकडून आक्षेप, हरकती मागविण्यात आल्याचे चौरपगार म्हणाले.