Published On : Tue, May 26th, 2020

पूर्व GMCH विद्यार्थानी, डॅाक्टर्सला N95 मास्क व सॅनिटायझर करून दिले उपलब्ध

नागपुर: सध्या जगावर कोवीड-१९ चे सावट आहे. हजारो लोक या रोगामुळे मृत्यूच्या दाढेत ढकलल्या गेले आहेत, कुठे होणार्‍या स्थलांतरामधे अनेकांचा जीव जात आहे तर कुठे कुणाचा भुकेने बळी जात आहे. अशा वेगवेगळ्या दिशांनी कोविड-१९ माणसांवर व अनुशंगाने माणुसकीवर हल्ला चढवत आहे. यास सामोरे जाण्यासाठी डॉक्टर्स प्रयत्नांची शर्थ करीत आहेत, त्यात इंटर्न डॉक्टर्सही मोठी भूमिका बजावित आहेत, माणसांना वाचवित आहेत. तर दुसरीकडे आपल्या या छोट्या सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचा बचाव करण्यासाठी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी N-95 मास्क, सॅनिटायझर यासारख्या विविध उपयोगी वस्तूंचे दान करीत आहेत व माणूसकी जपत आहेत. याप्रकारचे दान एव्हाना २००४, २००६, २००७ व २०१० बॅचच्या विद्यार्थ्यांनी केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्याच्या संकटाच्या काळात जेव्हा सर्वांना आपल्या घरी सुरक्षित राहण्याचे आवाहन केले जात आहे तेव्हा इंटर्न डॉक्टर्स बाहेर कोरोनाशी दोन हात करीत आहेत; पण हे करीत असताना त्यांचा बचाव करणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे, कारण सैनिकांशिवाय लढाई जिंकता येत नाही. यासाठी त्यांना N-95 मास्क, सॅनिटायझर, स्टराईल किट्स सारख्या वस्तूंची नितांत गरज भासते आणि सध्य:परिस्थितीमधे यांची तीव्र टंचाई आहे, ही बाब ओळखून या वस्तू उपलब्ध करुन देण्यात आले आहे.


सुरुवातीच्या काळात अनेक दिवस इंटर्न्सनी विना मास्क, प्रतिबंधात्मक उपाय-योजनांशिवाय सेवा दिली, प्रशासनाकडून येणारी मदत पुरेशी नव्हती. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या २००६ बॅचचे विद्यार्थी पुढे सरसावले आणि त्यांनी ९०० N95 मास्क व तब्बल 70 ली. सॅनिटायझर उपलब्ध करून दिले. या नंतर लागोपाठ २००४ बॅचच्या विद्यार्थ्यांनी 1100 N95 मास्क , २००७ बॅचच्या विद्यार्थ्यांनी ४०० N95 मास्क मास्क उपलब्ध करून दिले. तसेच २०१० बॅचचे विद्यार्थी स्मार्ट ओपीडी (बाह्य रुग्ण विभाग) उभारण्यासाठी देणगी जमा करीत आहेत. जेव्हा जेव्हा गरज भासते तेव्हा तेव्हा सिनियर्स मदतीसाठी धावून येतात, अशी शा. वै. म. नागपूर मधे म्हण आहे व तीच म्हण माजी विद्यार्थी खरी ठरवताना दिसत आहेत.

“एका हाताने दान केल्यावर दुसर्‍या हाताला कळू नये, अशी आपली संस्कृती आहे व यापद्धतीनेच हे सर्व दान झाले असले तरी हे प्रकाशझोतात येणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण अशा प्रकारच्या दानाचा झरा अखंड वाहत राहणे गरजेचे आहे, अजून मदतीची गरज आहे. यातून विविध लोकांनी प्रेरीत होऊन विविध वैद्यकीय महाविद्यालयांना या स्वरुपाची मदत करणे अपेक्षित आहे.” याप्रकारचे मत स्टेट मेडीकल इंटर्न्स अशोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. मयूर श्रीराव व डाॅ.श्रीनाथ फुले यांनी यावेळी व्यक्त केले.