१ व २ जुलै २०१६ च्या घोषित शाळांना २० टक्के अनुदान

Vinod Tawde
नागपूर: १ व २ जुलै, २०१६ अन्वये मुल्यांकन करुन अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या सुमारे १५८ प्राथमिक शाळा व ५०४ तुकड्यांवरील १४१७ शिक्षक व ६३१ माध्यमिक शाळा व १६०५ तुकड्यांवरील ५३७३ शिक्षक व २१८० शिक्षकेत्तर अशा एकूण ८९७० कर्मचाऱ्यांना २० टक्के अनुदान देण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज केली. तसेच ऑनलाईन मूल्यांकन झाल्यानंतर अनुदानास पात्र ठरणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालय/उच्च माध्यमिक शाळा, आणि तुकड्यांची यादी माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडे प्राप्त झाली असून हे अधिवेशन संपण्यापूर्वी ही पात्र यादी घोषित करण्यात येईल, असे शिक्षणमंत्री तावडे यांनी आज विधान परिषदेत घोषित केले. २० टक्के अनुदान प्रकरणी मंत्रीमंडळाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पुढील अनुषांगिक कार्यवाही तात्काळ केली जाईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

दोन्ही निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर सुमारे १०० कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे, असेही तावडे यांनी सांगितले.

१४ जून २०१६ पूर्वी अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळांना अटी व शर्तींच्या अधिन राहून २० टक्के अनुदान देण्याचा मंत्रीमंडळ निर्णय ३० ऑगस्ट २०१६ च्या बैठकीत घेण्यात आला होता, तोच निर्णय १ व २ जुलै, २०१६ च्या पात्र शाळांसाठी लागू राहील, असेही तावडे यांनी सांगितले.

शिक्षक संघटनांच्या या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या, आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार ना. गो. गाणार, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार विक्रम काळे, आमदार दत्तात्रय सावंत, आमदार सुधीर तांबे, आमदार बाळाराम पाटील, आमदार अनिल सोले, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणूनाथ कडू, महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक कमवि शाळा कृती समितीचे तानाजी नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात आला. त्या अनुषंगाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समवेत अनेक बैठका घेण्यात आल्या. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या संदर्भात चर्चा केली. त्यानुसार या निर्णयांची घोषणा करण्यात आल्याचे तावडे यांनी विधान परिषदेत सांगितले.

शिक्षणमंत्र्यांच्या या घोषनेनंतर विरोधी पक्षनेते मुंडे यांनी शिक्षणमंत्र्यांचे आभार मानले. तसेच आमदार विक्रम काळे यांनीही शिक्षक संघटंनाच्यावतीने शिक्षकांच्या या मागण्यांना न्याय दिल्याबद्दल तावडे यांचे अभिनंदन केले.