निलंबित करण्याची सभागृहाची जोरदार मागणी

Dhananjay Munde
नागपूर : बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात गरम ऊसाच्या रसाचा हौद फुटुन झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक घनशाम पाळवदे यांच्याविरूध्द विधान परिषदेत हक्कभंग दाखल झाला आहे, विरोधी पक्षनेत्यांशी असभ्य वर्तन करणाऱ्या घनशाम पाळवदे यास तातडीने निलंबित करण्याची मागणी संपुर्ण सभागृहाने केली. तर या प्रकरणी हक्कभंग दाखल करून घेत तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश सभापतींनी दिले आहेत.

दिनांक 8 डिसेंबर रोजी घडलेल्या वैद्यनाथ कारखान्यावरील घटनेत 6 कामगारांचा मृत्यु तर 3 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल घटनास्थळास भेट देण्यासाठी ना.धनंजय मुंडे हे गेले असता त्या ठिकाणी बंदोबस्तास असलेल्या पाळवदे यांनी त्यांना जाण्यापासून मज्जाव केला. एवढेच नव्हे तर त्यांच्याशी शाब्दीक वाद घातला, असभ्य वर्तन केले.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नियम 241 अन्वये धनंजय मुंडे यांनी आज हक्कभंग सभागृहात मांडला, संपुर्ण घटनाक्रम सभागृहात कथन केला. त्यामुळे संपुर्ण सभागृहातील सदस्यांनी संतप्त भावना व्यक्त करत विरोधी पक्षनेत्यांशी असभ्य वर्तन करणाऱ्या पाळवदे यास निलंबित करण्याची मागणी लावून धरली. आ.अमरसिंह पंडित, आ.जयवंत जाधव, आ.किरण पावसकर, आ.ख्वाजा बेग, आ.रामराव वडकुते यांच्यासह सर्व सदस्य यावेळी प्रचंड आक्रमक झाले होते. हक्कभंग दाखल झालेला अधिकारी या घटनेतील पुरावे नष्ट करू शकतो त्यामुळे त्याची किमान बदली तरी जिल्हाबाहेर करावी, अशी आग्रही मागणी केली. सभापती श्री.रामराजे निंबाळकर यांनी हा हक्कभंग दाखल करून घेत असल्याचे जाहीर करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.