Published On : Tue, May 30th, 2023

नागपूरच्या रस्त्यावर १९४ पादचाऱ्यांना गमवावा लागला जीव तर…

Advertisement

नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२३ दरम्यान नागपूरच्या रस्त्यावर १९४ पादचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे, तर तब्बल ३७९ जण जखमी झाले आहेत. नागपूर वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात आकडेवारी जाहीर केली आहे.

नागपुरात रस्ते अपघातात २०२१ मध्ये, ७० पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आणि १४१ गंभीर जखमी झाले. कोरोनाच्या संकटादरम्यान २०२२ मध्ये लॉकडाऊन शिथिल केल्या गेल्याने आकडेवारीत पुन्हा वाढ झाली आहे. यादरम्यान ९२ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला असून १८१ जण जखमी झाल्याची माहिती आहे.

नागपूर वाहतूक विभागाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते एप्रिल २०२३ या कालावधीत एकूण ३२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर ५७ जण जखमी झाले आहेत. राज्य महामार्ग पोलीस विभागाच्या अहवालानुसार २०२२ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात रस्ते अपघातात २,८९४ पादचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर मागील वर्षी महाराष्ट्रात पादचाऱ्यांसह एकूण ६,७६४ अपघात झाले, ज्यात ३,२८९ गंभीर जखमी झाले. लॉकडाऊनच्या काळात २०२० आणि २०२१ मध्ये रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्यांची संख्या आताच्या तुलनेने कमी होती. तथापि, २०२२ मध्ये मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी बहुतेक मृत्यू पादचाऱ्यांचा मृत्यू बेजबाबदारपणे रस्ता ओलांडल्यामुळे आणि नियमांबाबत जागरूकता नसल्यामुळे झाले आहेत.

महाराष्ट्रात २०२१ आणि २०२० मध्ये अनुक्रमे ६,१४८ आणि ५,१५६ पादचाऱ्यांचे अपघात झाले, ज्यामुळे २,६७७ आणि २,२१४ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, या गंभीर समस्येचे प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी प्रत्येक संभाव्य उपाय योजना आणि अंमलबजावणी केली जात आहे. यामाध्यमातून पादचाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, पदपथावरील अतिक्रमण काढण्यात अधिकारी अपयशी ठरल्याचा ठपका स्थानिकांनी घातला, ज्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते. याच कारणामुळे पादचाऱ्यांना अपघाताला तोंड द्यावे लागत आहे.

– शुभम नागदेवे