नागपूर : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. पोलीस आयुक्त डॉ. विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ६ हजार २५० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तात तैनात राहणार आहेत. गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.
यंदा शहरात १ हजार ७०२ सार्वजनिक गणेश मंडळांची नोंदणी झाली असून, सुमारे २ लाख ४ हजार घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान सी.ए. रोड, फुटाळा रोड, कोराडी रोड, इतवारी, महाल, जाफरनगर, कॉटन मार्केट आणि भांडेवाडी परिसरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
विसर्जनासाठी गोरेवाडा, पोलीस लाईन टाकळी, नांदा कोराडी, कच्छीविसा आणि महादेव घाट यांसह महापालिकेच्या कृत्रिम विसर्जन तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे.
२५ आणि २६ सप्टेंबर रोजी रात्री ८ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत शहरातील काही प्रमुख मार्गांवर जड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध राहणार आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध मार्गांवर वाहतूक वळविण्यात येणार आहे.
सुरक्षेसाठी २ हजार ८५८ सीसीटीव्ही कॅमेरे, ५ मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन आणि ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाची कंपनी, दंगल नियंत्रण पथके, क्विक रिस्पॉन्स टीम आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. अग्निशमन विभागाचे ३१ वाहने आणि १३ आपत्ती व्यवस्थापन पथकेही तैनात राहणार आहेत.
सोशल मीडियावरही पोलिसांची करडी नजर असून आतापर्यंत ७७१ पोस्ट आणि व्हिडिओंचे निरीक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी आक्षेपार्ह १३ पोस्टवर कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त डॉ. विश्वास नांगरे पाटील यांनी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा दिशाभूल करणारी माहिती पुढे पाठवू नये, असे आवाहन केले आहे.




