
नागपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असताना सरकारने उपाययोजनांना वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे.
दुष्काळग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार तातडीच्या उपाययोजना करण्याची जबाबदारी या समितीवर असेल. गावागावातील पंचनामे अचूक झाले आहेत का, पिण्याचे पाणी वर्षभर ते दीड वर्ष पुरेल का, जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध आहे का आणि गरजू नागरिकांना रेशनचे अन्नधान्य मिळत आहे का, याची तपासणी समितीकडून केली जाणार आहे.
या समितीची बैठक दर मंगळवारी संध्याकाळी होणार असून, आठवडाभरातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. NDRFच्या मदतीची प्रतीक्षा न करता राज्य सरकार आपल्या स्तरावर उपाययोजना सुरू करणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
पीकविमा कंपन्यांसोबतही बैठक घेऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती आणि कशा पद्धतीने लाभ मिळत आहे, याचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच दुष्काळी भागातील प्रत्येक बाधित व्यक्तीपर्यंत मदत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
दरम्यान, महसूल विभागातील कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांची संख्या वाढवण्यात येत आहे. नागपूरसह पंढरपूर आणि बारामतीला अतिरिक्त जिल्हाधिकारी देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.




