Published On : Wed, Dec 12th, 2018

मनपा शाळांचा १४ पासून ‘शिक्षण सप्ताह’

२२ ला समारोप : क्रीडा स्पर्धांसह सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन

नागपूर : नागपूर महानगरपालिका संचालित शाळांतील विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी आणि कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी बालदिनाचे औचित्य साधून ‘शिक्षण सप्ताहा’चे आयोजन करण्यात येते. यंदा १४ डिसेंबरपासून ‘शिक्षण सप्ताहा’ची सुरुवात होणार असून २२ डिसेंबरला कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित रंगारंग कार्यक्रमांनी समारोप होईल.

सदर शिक्षण सप्ताहाच्या आयोजनासंदर्भात क्रीडा सभापती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, क्रीडा अधिकारी नरेश सवाईथूल यांच्यासह संबंधित शिक्षकांची यावेळी उपस्थिती होती. शिक्षण सप्ताहादरम्यान सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी, लंगडी, १०० मीटर लांब उडी, तिहेरी उडी, गोळाफेक, भालाफेक, बुद्धीबळ स्पर्धांचा समावेश राहील तर सांस्कृतिक स्पर्धांमध्ये वक्तृत्व स्पर्धा, नाटक, नृत्य स्पर्धांचा समावेश राहील. या स्पर्धांसाठी वर्ग १ ते ४ आणि ५ ते ८ असे मुला-मुलींचे गट राहतील. १४ ते १८ डिसेंबर दरम्यान झोननिहाय शाळांच्या स्पर्धा होतील. दोन झोनच्या स्पर्धांचे आयोजन एका ठिकाणी करण्यात आले आहे. झोन स्तरावर सांघिक खेळांमधील विजेता संघ आणि वैयक्तिक स्पर्धांमधील विजेता आणि उपविजेता केंद्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरतील.


केंद्रीय स्पर्धा १९ ते २१ डिसेंबर दरम्यान यशवंत स्टेडियम येथे होतील. १९ डिसेंबर रोजी सांघिक स्पर्धा, २० डिसेंबर रोजी वैयक्तिक स्पर्धा आणि २१ डिसेंबर रोजी सांस्कृतिक स्पर्धा होतील. स्पर्धेतील विजेत्यांना २२ डिसेंबर रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात सकाळी १०.३० वाजता आयोजित कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात येईल. यावेळी विद्यार्थ्यांच्या रंगारंग कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती क्रीडा सभापती नागेश सहारे यांनी दिली.

केंद्रीय स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश
यंदा प्रथमच मनपातर्फे मोठ्या प्रमाणावर शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. केंद्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश देण्यात येणार आहे. १९ ते २१ डिसेंबरदरम्यान आयोजित केंद्रीय स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांना भोजनही देण्यात येणार असल्याचे सभापती नागेश सहारे यांनी सांगितले.