राज्यातील १३ हजार शाळा वीजेपासून वंचित – शशिकांत शिंदे
नागपूर : राज्यातील १३ हजार ८४४ शाळांमध्ये अद्यापपर्यंत वीज पोहोचली नाही. ४४ हजार ३३० शाळातील विद्यार्थ्यांना संगणक म्हणजे काय याची माहिती नाही अशी धक्कादायक माहिती विधीमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून विधानपरिषदेच्या सभागृहात दिली.
शाळांमध्ये डिजिटल क्लासरुम असावा अशी जनतेची मागणी आहे. पण यासाठी निधी अपूरा पडत आहे. याआधी केंद्रातून पैसे येत होते पण आता ते पैसे येणेच बंद झाले आहे. त्यामुळे शाळांमधील डिजिटल क्लासरुममधील परिस्थिती वाईट आहे. डिजिटल क्लासरूमसाठी बजेटमध्ये तरतूद करावी अशी मागणी शिंदे यांनी केली. राज्यातील या शाळांना नीट विद्युत पुरवठा नाही, एमएसईबी या शाळांना खासगी दर लावत आहे.
या शाळांचा विद्युत पुरवठा नीट करावा आणि या शाळांसाठी वीजदर कमी करावेत व निधी वाढवून मिळवण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणीही शशिकांत शिंदे यांनी लक्षवेधीच्या माधयमातून सरकारकडे केली.