Published On : Mon, Jun 10th, 2019

ग्रामीण भागातील वीज पुरवठा मध्यरात्री सुरळीत

Advertisement

वायफाड गावात १२० विजेचे खांब उभे केले

Mahavitaran Logo Marathi

शनिवारी संध्याकाळी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे नागपूरसह वर्धा जिल्ह्यात ठिकठाणी खंडित झालेला वीज पुरवठा महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन मध्यरात्री सुरळीत केला. वर्धा जिल्ह्यातील वायफड परिसरात सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेती पंपाला वीज पुरवठा करणारे सुमारे २५० विजेचे खांब जमीनदोस्त झाले. यातील १२० पेक्षा अधिक विजेचे खांब महावितरणकडून तात्काळ पुन्हा उभे करण्यात आले असून लवकरच या वाहिनीवरील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येईल.

याच उपकेंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध गावात ४५ उच्चदाबाचे वीज खांब देखील जमीनदोस्त झाले असून पडलेले वीज खांब उभे करण्यासाठी महावितरणकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. वर्धा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे जातीने कामावर लक्ष ठेऊन आहेत.

वर्धा विभागातील कानगाव वीज वाहिनी शनिवारी रात्री बंद पडल्यावर तात्काळ दुसऱ्या मार्गाने वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. आर्वी- खरांगणा मार्गावरील वीज वाहिनी वादळी वाऱ्यामुळे बंद पडली होती. महावितरणकडून यातील बिघाड दुरुस्त करून ११ वाजता परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

शनिवारी काटोल विभागात येणाऱ्या कोंढाळी वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने साधारण रात्री वीज पुरवठा बंद पडला. महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी तात्काळ बाजारगाव येथून वीज पुरवठा घेऊन मध्यरात्री १२. ३० च्या सुमारास वीज पूर्णतः पूर्ववत केला. महावितरणच्या त्रिमूर्ती नगर वीज उपकेंद्रात झालेला बिघाड रात्री ९. ३० च्या सुमारास दार केल्यावर जयताळाउपकेंद्रात बिघाड झाल्याने येथील वीज पुरवठा रात्री १० ते ११ या कालावधीत बंद होता. भंडारा मार्गावरील महावितरणच्या कापशी शाखा कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या पांढुर्णा आणि बिडगाव येथे वीज पुरवठा करणारी वाहिनी ४ ठिकाणी तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणकडून तात्काळ वीज वाहिन्या जोडून येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

मागील ३-४ दिवसापासून वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागत असल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडित होऊ लागला आहे. खंडित झालेला वीज पुरवठा महावितरण कडून शक्य तितक्या तातडीने सुरळीत करण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. वीज वाहिनी जर नादुरुस्त होऊन रात्रीच्या वेळी ती दुरुस्त करणे शक्य नसल्यास अनेक ठिकाणी पर्यायी मार्गाने वीज पुरवठा करून वीज ग्राहकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतल्या जात आहे. अशी माहिती नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी दिली.