नागपूर : शहरात पुन्हा माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका सरकारी शाळातील ५७ वर्षीय शिक्षकाने १२ वर्षाच्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी शिक्षकाला अटक केली असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.
माहितीनुसार,संजय विठ्ठल पांडे ( रा. प्लॉट क्रमांक ६५, कामगार नगर) येथील रहिवासी आहे.
तो पीडित विद्यार्थिनीला शाळेच्या सायन्स लॅबमध्ये घेऊन जाऊन तिचे लैंगिक शोषण करत असे, असे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 वर्षीय पीडित मुलगी तिच्या आईकडे पोटदुखीची वारंवार तक्रार करत होती. सुरुवातीला तिच्या आईने तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले होते. मात्र सातत्याने पीडित मुलीच्या तक्रारीमुळे आईला संशय आला. त्यानंतर, तिने पीडितेला विश्वासात घेऊन तिची आपबिती ऐकली. त्यानंतर तातडीने पीडितेच्या आईने आरोपी शिक्षकाविरोधात पोलिसात तक्रार केली.
याप्रकरणी ‘नागपूर टुडे’शी बोलताना सक्करदरा पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री आम्हाला या संदर्भात तक्रार मिळाली. प्राथमिक तपासानंतर या प्रकरणी आम्ही आयपीसीच्या कलम 376(AB), 376(2)(F), 376(2)(N), 506 नुसार POCSO कायद्याच्या कलम 4,6 नुसार गुन्हा नोंदवला. त्यानंतर आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.