नागपूर : राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिवस ठरला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दहावीचा निकाल जाहीर केला असून, यंदा राज्याचा एकूण निकाल ९४.१० टक्के इतका लागला आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन निकालाची माहिती दिली.
नागपूर विभागाची टक्केवारी घसरली-
राज्यात कोकण विभागाने पुन्हा एकदा सर्वोच्च कामगिरी करत अव्वल स्थान पटकावले आहे. कोकण विभागाचा निकाल तब्बल ९८.८२ टक्के इतका लागला आहे, जो यंदाच्या निकालातील सर्वोच्च आकडा आहे. दरम्यान, नागपूर विभागाची कामगिरी मात्र निराशाजनक ठरली असून केवळ ९०.७८ टक्के निकालासह तो शेवटच्या क्रमांकावर आहे.
राज्यातील अन्य विभागीय निकालांचा आढावा घेतला असता, कोल्हापूर विभागाने ९६.८७ टक्के, तर मुंबई विभागाने ९५.८४ टक्के निकाल नोंदवला आहे. पुणे, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि लातूर या विभागांचाही निकाल ९२ ते ९४ टक्क्यांच्या दरम्यान राहिला आहे.
यंदाच्या निकालात एक महत्त्वाची बाब म्हणजे, मुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा उजवी कामगिरी केली आहे. मुलींची टक्केवारी ९६.१४, तर मुलांची टक्केवारी ९२.३१ इतकी असून, मुलींनी ३.८३ टक्के आघाडी घेतली आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाचा निकाल किंचित कमी असून, एकूण टक्केवारीत १.७१ टक्क्यांची घट झाली आहे. तरीही अनेक विभागांत विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून पाहण्यासाठी उपलब्ध असून, निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.